एनडी स्टुडिओ सरकारने ताब्यात घ्यावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2023 02:10 PM2023-08-04T14:10:41+5:302023-08-04T14:11:56+5:30
"देसाई यांचे मूळ कर्ज हे व्याज वाढून अडीचशे कोटींपर्यंत कसे काय पोहोचले? त्यांना आर्थिक विवंचनेत कोणी ढकलले, याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे."
मुंबई : कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्येप्रकरणी सरकारने या सगळ्यांच्या मुळाशी जाऊन एडेलवेस फायनान्स कंपनीची चौकशी करावी. अशी मागणी भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर यांनी विधान परिषदेत औचित्याच्या मुद्याद्वारे केली.
देसाई यांचे मूळ कर्ज हे व्याज वाढून अडीचशे कोटींपर्यंत कसे काय पोहोचले? त्यांना आर्थिक विवंचनेत कोणी ढकलले, याची देखील चौकशी होणे गरजेचे आहे, असे ते म्हणाले. नितीन देसाई यांच्या शेवटचे कॉल रेकॉर्डिंग मन विषण्ण करणारे आहे. त्यात त्यांनी सांगितल्याप्रमाणे एनडी स्टुडिओ राज्य सरकारने ताब्यात घेऊन कलावंतांना प्रोत्साहन देण्यासाठी भव्य कलामंच उभारावा, अशी मागणी दरेकर यांनी केली.
कोणत्या कलाकाराची दहशत?
आमदार प्रसाद लाड यांनी बॉलिवूडमधील एक अभिनेता देखील या प्रकरणात असून देसाईंना काम मिळू नये, असा त्याचा दबाव होता. कोणत्या कलाकाराची ही दहशत आहे, हेदेखील बाहेर येण्याची आवश्यकता त्यांनी व्यक्त केली. काँग्रेसचे आमदार भाई जगताप आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार सचिन अहिर यांनी देसाई यांच्याविषयीच्या आठवणी सांगितल्या. एनडी स्टुडिओ राज्य सरकारने देसाईंच्या कुटुंबीयांशी चर्चा करून ताब्यात घ्यावा याला अनुमोदन दिले.
‘स्टुडिओ कोणाच्याही घशात जाणार नाही’ -
नितीन देसाई यांनी अत्यंत कष्टाने उभारलेला एनडी स्टुडिओ कोणाच्याही घशात जाणार नाही, याची काळजी राज्य सरकार घेईल, असे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधान परिषद सभागृहाला आश्वासित केले. या सगळ्या प्रकरणाची चौकशी सुरू आहे, असेही ते म्हणाले.