Video: मुंबईत पावसाचा हाहाकार! रेल्वे रुळांवर NDRF बोट प्रवाशांच्या मदतीसाठी सरसावली
By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 09:59 PM2020-08-05T21:59:18+5:302020-08-05T22:00:05+5:30
रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवासी अडकून पडले होते, या प्रवाशांना एनडीआरएफच्या बोटीतून रेस्क्यू करण्यात आलं.
मुंबई – शहरात आज सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे मुंबईकरांची प्रचंड तारांबळ झाली, अनेक ठिकाणी पाणी साचल्याचं चित्र पाहायला मिळालं, वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडली, रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने अनेक अत्यावश्यक कर्मचाऱ्यांसाठी सुरु असणाऱ्या रेल्वेसेवेवर परिणाम झाला.
रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने मध्य रेल्वे आणि हार्बर रेल्वेची वाहतूक ठप्प झाली. यातच मस्जिद बंदर ते भायखळा दरम्यान २ लोकल ट्रेन्स अडकल्या होत्या. सीएसटीवरुन कर्जतच्या दिशेने जाणाऱ्या या ट्रेन्समध्ये १५० प्रवाशी होते त्यांना रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी, पोलिसांनी रेस्क्यू केले. तर दुसऱ्या ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांचीही सुटका एनडीआरएफच्या माध्यमातून करण्यात आली.
रेल्वे रुळांवर पाणी साचल्याने प्लॅटफॉर्मवर प्रवासी अडकून पडले होते, या प्रवाशांना एनडीआरएफच्या बोटीतून रेस्क्यू करण्यात आलं. पावसामुळे अडकलेल्या प्रवाशांची मुंबई महापालिकेकडून जवळच्या महापालिका शाळांमध्ये तात्पुरती निवासस्थानाची सोय करण्यात आली.
#MumbaiRains#StrandedTrains Update
— ѕαtчα prαdhαnसत्य नारायण प्रधान ସତ୍ଯପ୍ରଧାନ-DG NDRF (@satyaprad1) August 5, 2020
2115 hrs 5/8/20
✅2 locals stranded @ Masjid
✅Many passengers on board
✅Water abt 2.5-3 ft
✅@NDRFHQ team ON SPOT ✅Rescue ops started
✅Boats being used@ndmaindia@PMOIndia@HMOIndia@PIBHomeAffairs@ANI@PIBMumbai@DDNewslivepic.twitter.com/rniIN1yMR2
मुंबई शहर आणि उपनगरात सायंकाळी ५ नंतर पावसाने पकडलेला जोर रात्री आठ वाजेपर्यंत कायम होता. विशेषत: दक्षिण मुंबईत वेगाने वारे वाहत असतानाच मंत्रालय परिसरातील झाडे खाली कोसळली. रस्त्यावर कोसळलेल्या झाडांमुळे येथील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वा-या व्यतीरिक्त टपोरे थेंब मुंबईकरांना झोडपून काढत होते. दुसरीकडे गिरगाव चौपाटीवर खवळलेल्या समुद्राने तर मुंबईकरांना आपले रौद्र रुप दाखविले. आणि पावसाने धिंगाणा घातला असतानाच दक्षिण व मध्य मुंबईतल्या बहुतांश ठिकाणांवरील सखल भागात पावसाचे पाणी साचले. दक्षिण मुंबईतल्या जे.जे रुग्णालयात देखील पावसाचे पाणी साचले होते.
दरम्यान, आपत्ती व्यवस्थापन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ८:३० वाजता मंत्रालय नियंत्रण कक्षास भेट देऊन राज्यातील तसेच मुंबई तील वादळी वाऱ्यासह झालेल्या पाऊस, पूर, झाडे पडलेल्या घटनांचा आढावा घेतला. विशेषतः कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदीच्या पुर परिस्थितीची माहिती घेतली. प्रशासनाला सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या. तसेच जनतेला घरातच राहून सुरक्षित राहण्याचे आवाहन केले आहे.