आगामी काळात शहरे, गावांना ओपीजीडब्ल्यूद्वारे (ऑप्टिकल ग्राउंड वायर) जोडणार; महापारेषणचा संकल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2021 04:07 AM2021-02-25T04:07:22+5:302021-02-25T04:07:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : जॅाईंट व्हेंचर उपक्रमाद्वारे अतिउच्च दाब वाहिन्यांच्या मनोऱ्यावर महापारेषणचे ओपीजीडब्ल्यूचे (ऑप्टिकल ग्राउंड वायर) तीन हजार ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : जॅाईंट व्हेंचर उपक्रमाद्वारे अतिउच्च दाब वाहिन्यांच्या मनोऱ्यावर महापारेषणचे ओपीजीडब्ल्यूचे (ऑप्टिकल ग्राउंड वायर) तीन हजार किमी लांबीचे जाळे राज्यातील नऊ मुख्य शहरे, १८५ शहरे, गावांना व २५ जिल्ह्यांतील ९९४ ग्रामपंचायतींना जोडत असून, आगामी काळात महाराष्ट्रातील शहरे, गावांना ओपीजीडब्ल्यूद्वारे जोडण्याचा महापारेषणचा संकल्प आहे. शिवाय अतिरिक्त आर्थिक स्रोतामुळे पारेषण दरामध्ये कपात शक्य होईल, असा दावा महापारेषणने केला आहे.
भूमिगत ऑप्टिकल फायबर केबलपेक्षा मनोऱ्यावरील ओपीजीडब्ल्यू ही जास्त सुरक्षित आहे. भूमिगत जाळ्यांपेक्षा महापारेषणच्या अतिउच्च दाब वाहिन्यांच्या मनोऱ्यांवरील ओपीजीडब्ल्यू जाळ्यांचे अनेक फायदे आहेत. त्यामुळे देशातील प्रमुख नेटवर्क ऑपरेटर्स उच्च नेटवर्क उपलब्धतेमुळे याचा प्राधान्याने उपयोग करतात. महापारेषणचे ओपीजीडब्ल्यू नेटवर्क केवळ मुंबई, पुणे यासारख्या महानगरांत नसून ग्रामीण व दुर्गम भागांतही उपलब्ध आहे. महापारेषणचा ओपीजीडब्ल्यू प्रकल्प हा देशातील राज्य पारेषण उपक्रमाने राबविलेला सर्वांत मोठा प्रकल्प आहे. त्याद्वारे अंतर्गत दूरसंचारणाची गरज भागवून अतिरिक्त फायबर भाडेतत्त्वावर दिल्यामुळे डिजिटल क्रांतीचा मार्ग सुकर होणार आहे. जादा महसुलाद्वारे पारेषण भाड्यामध्ये कपातीस मदत होणार आहे.
महापारेषणच्या मनोऱ्यांवर मोबाईल नेटवर्क ऑपरेटर्सची दूरसंचार उपकरणेही बसविली आहेत. उपलब्ध साधन संपत्तीच्या सुयोग्य वापरामुळे हे शक्य झाले आहे. ओपीजीडब्ल्यू हे अर्थिंग व दूरसंचरण अशा हे कार्यात उपयोगाला येते. महापारेषणने सद्य:स्थितीत असलेल्या साधनांचा योग्य उपयोग करून उत्पन्नाचा नवीन स्रोत साध्य करण्याचा उपक्रम यशस्वीरीत्या राबविला आहे. दरम्यान, ७१ व्या ऑनलाईन शिखर संमेलनात स्कॉच पुरस्काराची घोषणा करण्यात आली. यामध्ये कार्पोरेट एक्सलन्स’ अंतर्गत डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर यासाठी महापारेषणला सुवर्ण पारितोषिकाची घोषणा झाली. कंपनीने जॅाईंट व्हेंचर उपक्रमाद्वारे अतिउच्च दाब वाहिन्यांच्या मनोऱ्यावर ओपीजीडब्ल्यू (ऑप्टिकल ग्राउंड वायर) नेटवर्क प्रस्तापित केले आहे.