लोकसभेचं घोडा-मैदान जवळ; तरीही 'या' ४ जागांवर अडलंय महायुतीचं घोडं
By ऑनलाइन लोकमत | Published: April 1, 2024 08:38 PM2024-04-01T20:38:29+5:302024-04-01T20:39:38+5:30
भाजपाने आपल्या २४ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडून ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे.
मुंबई - आगामी लोकसभा निवडणुकांसाठी पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्यापैकी, विदर्भातील उमेदवारांची छाननी प्रक्रियाही पूर्ण झाली. तर, आजा मराठवाड्यातील उमेदवारांचे अर्ज भरायला सुरुवात झाली आहे. महायुतीचे परभणीचे उमेदवार आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला. त्यासाठी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही परभणीत दाखल झाले होते. दोन्ही नेत्यांनी जानकरांसाठी बॅटींग केली. मात्र, अद्यापही महायुतीमधील ४ जागांवरुन तिढा कायम आहे. लोकसभेचं घोडा-मैदान जवळ आलंय, तरीही ४ जागांवर महायुतीच्या नेत्याचं घोडं अडलंय.
भाजपाने आपल्या २४ उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. तर, शिवसेना शिंदे गटाकडून ८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर झाली आहे. राष्ट्रवादीने आत्तापर्यंत ३ जागांवर उमेदवार घोषित केले आहेत. त्यामध्येच, एक जागा रासप म्हणजे महादेव जानकर यांना देण्यात आली आहे. मात्र, अद्यापही मुंबई, मराठवाड्यासह पश्चिम महाराष्टातील महत्त्वाच्या जागांवरुन खलबतं सुरू आहेत. त्यात, साताऱ्याची जागा भाजपला सोडण्यात येणार असल्याचं निश्चित मानलं जात आहे. तर, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव आणि रत्नागिरी-सिंधुदुर्ग या जागांवरुन महायुतीतील मित्रपक्षांचं घोडं अडलं आहे.
नाशिकची लोकसभेची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यासाठी राष्ट्रवादीचा आग्रह आहे. मात्र, या जागेवर शिंदेंच्या शिवसेनेचा विद्यमान खासदार आहे. तेही ही जागा सोडणार नाही. त्यामुळे, या जागेवरुन राष्ट्रवादी व शिवसेना यांच्यात चर्चा सुरू आहे.
धाराशिव लोकसभेसाठी महाविकास आघाडीकडून ओमराजे निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाली नाही. मात्र, महायुतीकडून अद्यापही उमेदवार निश्चित होत नाही. राष्ट्रवादीने ही जागा आपल्याकडे घेतली आहे. त्यामुळे, या जागेवर राष्ट्रवादीचाच उमेदवार निवडणूक लढवणार आहे. सध्या, अर्चना पाटील आणि विक्रम काळे यांचे नाव आघाडीवर आहे.
छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीने चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, एमआयएमने इम्तियाज जलील यांना तिकीट दिलं आहे. त्यामुळे, महायुतीत शिवसेनेकडे ही जागा असल्याने शिवसेनेकडून मराठा नेते विनोद पाटील यांना उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहे. तर, भाजपाही या जागेसाठी आग्रही आहे.
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा राहिलेला आहे. मात्र, या जागेसाठी भाजपा आग्रही असून माजी केंद्रीयमंत्री नारायण राणेंना येथून उमेदवारी देण्यात येणार आहे. तर, शिवसेना शिंदे गट ही जागा सोडायला तयार असून येथून रामदास कदम किंवा उदय सामंत यांच्या मर्जीच्या उमेदवाराला संधी देण्यात येणार आहे.
दरम्यान, महायुतीत अद्यापही या ४ जागांवर लोकसभेचं घोडं अडलं आहे. कराण, लोकसभेचं घोडा मैदान जवळ आलंय, पण उमेदवारच निश्चित होत नाहीत. मराठवाड्यात केवळ २५ दिवसांचा कालावधी उमेदवाराच्या हाती असणार आहे. त्यामुळे, पुढील दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल आणि महायुतीचा चर्चेतून मार्ग निघेल, असे दिसून येते.