अकरावी प्रवेशासाठी जवळचीच महाविद्यालये बरी ...!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:06 AM2021-07-21T04:06:42+5:302021-07-21T04:06:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थी, पालकांची अकरावी प्रवेशासाठीची लगबग सुरू झाली आहे. शिक्षण संचालनालयातर्फे ...

Nearby colleges are good for 11th admission ...! | अकरावी प्रवेशासाठी जवळचीच महाविद्यालये बरी ...!

अकरावी प्रवेशासाठी जवळचीच महाविद्यालये बरी ...!

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : दहावीचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थी, पालकांची अकरावी प्रवेशासाठीची लगबग सुरू झाली आहे. शिक्षण संचालनालयातर्फे महापालिकेच्या हद्दीतील अकरावीच्या प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. यंदाचे प्रवेश सीईटी परीक्षेच्या आधारावर होणार आहेत. यंदा अकरावी प्रवेशासाठी उत्तम महाविद्यालय निवडण्यावरच विद्यार्थी, पालकांचा भर असला तरी यंदा जवळच्याच महाविद्यालयात प्रवेशाचा निकषही महत्त्वाचा ठरणार आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती आणि या दरम्यान सुरक्षितता म्हणून जवळचा प्रवास, लांबच्या प्रवासासाठी उपलब्ध नसलेली वाहतूक सुविधा यामुळे जवळच्याच महाविद्यालयांत प्रवेश घेण्यावर विद्यार्थी, पालकांचा भर असल्याच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

अकरावीसाठीची सीईटी परीक्षा कधी होणार हे जाहीर झाले आहे. मात्र, त्यानंतरची प्रवेशप्रक्रिया कधी आणि कशा पद्धतीने होणार याची अद्याप स्पष्टता नाही. प्रवेश निश्चितीसाठी विद्यार्थ्यांना महाविद्यालयात जावे लागल्यास लांबच्या महाविद्यालयात सार्वजनिक वाहतुकीशिवाय प्रवास करणे विद्यार्थ्यांना, पालकांना गैरसोयीचे ठरणार आहे.

अनेक विद्यार्थी लॉकडाऊनच्या काळात गावी स्थलांतरित झाले आहेत. दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आता अकरावीत प्रवेश घेतानाही तिथून पुन्हा शहरात स्थलांतरित होणे अनेकांसाठी आर्थिक परिस्थितीच्या कारणास्तव अवघड झाले आहे. अशात अनेक विद्यार्थी गावी राहूनच अकरावी प्रवेश आणि पुढील शिक्षणाच्या विचारात आहेत. त्यातही गावी असलेल्या महाविद्यालयांत अकरावी प्रवेशासाठी फारशी स्पर्धा नसल्याने त्यांच्या प्रवेशाचा मार्ग सोपा होणार असल्याचेही ते सांगतात.

ऑफलाईन प्रवेश व्हावेत

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदाचे प्रवेश हे महाविद्यालयीन स्तरावर व्हायला हवेत, असे मत अनेक शिक्षक आणि शिक्षण संघटना मांडत आहेत. विद्यार्थी, पालकांच्या मनात कोरोनाविषयीची भीती अद्याप कायम आहे आणि तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता अद्याप शाळा, महाविद्यालयेही प्रत्यक्ष वर्गांसाठी बंदच आहेत. अशा परिस्थितीमध्ये महाविद्यालयांना स्थानिक पातळीवर ऑफलाईन पद्धतीने प्रवेश देण्याची मुभा द्यावी, अशी मागणी काही प्राचार्यही करत आहेत.

--------

म्हणून जवळच्या महाविद्यालयीन प्रवेश हवा

कोरोनाच्या भीतीमुळे यंदा दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या. त्यावेळीही रेल्वेसेवा बंद होत्या. आता अकरावी प्रवेशाच्या वेळीही त्या सुरू होतील की नाही यावर प्रश्नचिन्ह आहे. राहत्या घरापासून नामांकित महाविद्यालय दूर असले तर कोरोना संसर्गाची भीती प्रवासादरम्यान कायम राहणार आहे, शिवाय खासगी वाहनाने दैनंदिन एवढ्या दूर प्रवास शक्य नाही. त्यामुळे जवळच्याच महाविद्यालयांत प्रवेश घेण्याचा निर्णय घेतला आहे.

- अश्विनी लांबे, विद्यार्थिनी.

लॉकडाऊनमध्ये आम्ही गावी आलो आहोत. आर्थिक परिस्थितीमुळे आता पुन्हा शहरात जाणार की नाही अद्याप निश्चित नाही. कदाचित येथेच अकरावीसाठी यंदा प्रवेश घेऊन पुढच्या शैक्षणिक वर्षाचे नियोजन कोरोनाची परिस्थिती पाहून करण्याचे ठरविले आहे.

- राजेश निंबाळकर, विद्यार्थी.

----

अकरावी प्रवेशाच्या मागील वर्षीच्या जागा

शाखा- एकूण प्रवेश क्षमता- केंद्रीय फेरीत निश्चित प्रवेश- कोट्यामधील प्रवेश- एकूण प्रवेश

कला - ३७३००- १७८५३- ४२६१- २२११४

वाणिज्य - १७३८८०- ९९६७९- ३०६१९- १३०२९८

विज्ञान- १०३९१०- ५३६२३- १४५४४- ६८१६७

एचएसव्हीसी - ५६६०- २७२६- ३४६- ३०७२

एकूण - ३२०७५०- १७३८८१- ४९७७०- २२३६५१

Web Title: Nearby colleges are good for 11th admission ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.