Join us

गळ्यातली चेन? मोडायची वेळ आली, कसले ब्रेक द चेन?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० च्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. हा लॉकडाऊन काही महिने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर २०२० च्या मार्च महिन्यापासून लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. हा लॉकडाऊन काही महिने चालल्यामुळे अनेक व्यवसाय व उद्योग धंदे ठप्प झाले. तर अनेक जणांच्या नोकऱ्या गेल्या. हातावर पोट असणाऱ्या मजुरांवर तर उपासमारीची वेळ आली होती. जून महिन्यापासून लॉकडाऊनमध्ये काही प्रमाणात शिथिलता दिल्यानंतर ठप्प झालेले उद्योग-व्यवसाय पुन्हा हळूहळू रुळावर येण्यास सुरुवात झाली. मात्र लॉकडाऊनमध्ये फटका सहन करावा लागल्यामुळे अनेक जणांवर कर्जाचा भार झाला होता.

या परिस्थितीतून हळूहळू बाहेर येतो ना येतो तोच २०२१ मध्ये पुन्हा एकदा राज्य शासनाच्या वतीने मिनी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. ब्रेक द चेन? या उपक्रमांतर्गत कठोर निर्बंध घालण्यात आल्यामुळे पुन्हा एकदा छोटे उद्योग व व्यवसाय ठप्प होण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे अनेकांच्या कुटुंबावर उदरनिर्वाहाचा प्रश्न उभा राहिला आहे. दुकानदार व व्यावसायिकांच्या पत्‍नींना याची सर्वात जास्त चिंता लागून राहिली आहे. कर्जाचे हप्ते तसेच घर खर्च चालवण्यासाठी अनेक गृहिणींना सोन्याचे दागिने गहाण ठेवण्याची वेळ आली आहे. यामुळे कसले ब्रेक द चेन? इथे गळ्यातली चेन? मोडायची वेळ आली आहे, अशा भावना व्यक्त केल्या जात आहेत.

साक्षी गीते (घाटकोपर) - माझे पती जिम ट्रेनर असल्याने त्यांनी सहा महिन्यांपूर्वी त्यांनी प्रोटिन पावडरचा व्यवसाय सुरू केला होता. यासाठी एका गाळ्यात व्यवसाय सुरू केला होता. मात्र आता जिम तसेच दुकानही बंद असल्याने उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे.

जान्हवी फडतरे (चेंबूर) - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे छोट्या व्यावसायिकांचे जगणे कठीण झाले आहे. मागील संपूर्ण वर्ष असेच गेल्याने व्यावसायिकांच्या समोर अनेक प्रश्न उभे राहिले आहेत. मी माझे दागिने गहाण ठेवले आहेत. शासनाने छोट्या व्यावसायिकांकडे लक्ष द्यायला हवे.

दोन महिनेच सुरू राहिला व्यवसाय, कर्ज कसे फेडायचे?

काही महिन्यांपूर्वी कोरोनाची स्थिती आटोक्यात येत आहे, असे वाटत असतानाच आता पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे. यामुळे नव्याने सुरू करण्यात आलेली आहे ठप्प झाले आहेत. या व्यावसायिकांना समोर कर्ज कसे करायचे हा प्रश्न उभा राहिला आहे.