Join us

कोरोना रोखण्यासाठी आणखी १५ दिवसांचा लॉकडाऊन हवा- नीरज हातेकर

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2020 1:26 AM

किमान पुढील १५ दिवस तरी ताब्यात आलेली कोरोनाची संसर्गजन्य परिस्थिती पुन्हा आटोक्याबाहेर जाईल अशा निर्णयांना मान्यता देऊ नये, अशी विनंती त्यांनी राज्य प्रशासनाला केली आहे.

मुंबई : मुंबईत आणि राज्यात बहुतेक ठिकाणी आणि विशेषत: मुंबईत कोरोनाचा फैलाव बराचसा आटोक्यात येत आहे. या कारणास्तव राज्य प्रशासनाने हा फैलाव कमी होण्याची साखळी विस्कळीत होईल असे कोणतेही धोरणात्मक निर्णय सद्य:स्थितीत घेऊ नयेत, अशी विनंती मुंबई विद्यापीठाच्या अर्थशास्त्र विभागातील प्राध्यापक नीरज हातेकर यांनी केली आहे.आंतरजिल्हा प्रवास किंवा व्यायामशाळा, सलून यांना परवानगी अशा निर्णयामुळे फैलावात वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे किमान पुढील १५ दिवस तरी ताब्यात आलेली कोरोनाची संसर्गजन्य परिस्थिती पुन्हा आटोक्याबाहेर जाईल अशा निर्णयांना मान्यता देऊ नये, अशी विनंती त्यांनी राज्य प्रशासनाला केली आहे.महाराष्ट्रात कोरोनाची संख्या वाढीस लागल्यापासून राज्यातील, मुंबईतील आणि जगातील रुग्णसंख्या वाढीचा वेग, त्यांचा परिणाम आणि अंदाज नीरज हातेकर अभ्यास करीत आहेत. राज्यात व मुंबईत पुढील १५ दिवस शिथिलता देणे थांबवल्यास कोरोना संसर्गात आणखी घट होऊन रिप्रॉडक्शन नंबर ही (आर - म्हणजेच एक बाधित व्यक्ती आपल्या सहवासातील सरासरी किती लोकांना बाधित करते याचा अंदाज) १ च्या खाली जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आपल्याला आर्थिक आणि इतर दृष्टीने शिथिलता आणता येईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.यादरम्यान शिथिलतेचा गैरफायदा घेऊन अनावश्यक कारणांनी बाहेर पडू नये, अशा सूचना त्यांनी केल्या आहेत. गर्दीच्या किंवा जिथे हवा खेळती नसेल अशा ठिकाणी जाणे टाळायला हवे आणि शासनाला सर्वतोपरी सहकार्य करायला हवे, अशी भूमिका त्यांनी मांडली.मागच्या काही महिन्यांतील नीरज हातेकर यांच्या अभ्यासातून योग्य काळजी, नियमांचे पालन व जबाबदारीने वागल्यास पुढच्या काही महिन्यांत कोरोनाचा फैलाव आपण रोखू शकणार आहोत, असे त्यांनी म्हटले आहे.नीरज हातेकर यांच्या अभ्यासाप्रमाणे महाराष्ट्रातील आर २६ जून रोजी १.१९ इतका असून त्यात सातत्याने घट होत आहे. हा आर १ च्या खाली नेल्यास आपण कोरोनावर संपूर्ण ताबा मिळवू शकलो असे म्हणता येईल. त्यासाठी सर्वच लोकांनी बेजबाबदारीने वागू नये, सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करावे आणि मास्कचा वापर नेहमी करावा, असे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले आहे. शिवाय शासनानेही ‘मिशन बिगिन अगेन’च्या टप्प्यात शिथिलतेचे धोरणात्मक निर्णय घेताना आणखी थोडा वेळ घ्यावा, अशी विनंती केली आहे.>शासनाने थोडा वेळ घ्यायला हवानीरज हातेकर यांच्या अभ्यासाप्रमाणे महाराष्ट्रातील आर २६ जून रोजी १. १९ इतका असून त्यात सातत्याने घट होत आहे. हा आर १ च्या खाली नेल्यास आपण कोरोनावर संपूर्ण ताबा मिळवू शकलो असे म्हणता येईल. त्यासाठी सर्वच लोकांनी बेजबाबदारीने वागू नये, सोशल डिस्टंसिंगच्या नियमांचे पालन करावे आणि मास्कचा वापर नेहमी करावा असे आवाहन त्यांनी पुन्हा एकदा केले आहे. शिवाय शासनाने ही मिशन बिगिन अगेनच्या टप्प्यात शिथिलतेचे धोरणात्मक निर्णय घेताना आणखी थोडा वेळ घ्यावा अशी विनंती केली आहे.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्यामहाराष्ट्रात कोरोना व्हायरस