मासेमारी क्षेत्रावरील अधिकारांसाठी स्वायत्त सागरी परिषदेची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:07 AM2021-02-23T04:07:55+5:302021-02-23T04:07:55+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मच्छीमार समाजाची स्वायत्त सागरी परिषद निर्माण करावी अशी मागणी लोकभारती पक्षाचे अध्यक्ष आणि आ. ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मच्छीमार समाजाची स्वायत्त सागरी परिषद निर्माण करावी अशी मागणी लोकभारती पक्षाचे अध्यक्ष आणि आ. कपिल पाटील यांनी केली आहे.
मच्छीमारांचे राष्ट्रीय नेतेे, वेसाव्याचे माजी नगरसेवक कै. मोतीराम भावे यांच्या दुसऱ्या स्मृतिदिनानिमित्त ‘द्रष्टा लोकनेता मोतीराम भावे’ या पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे परिवहन व संसदीय कार्यमंत्री ॲड. अनिल परब यांच्या हस्ते चिल्ड्रन वेल्फेअर सेंटरच्या सभागृहात झाले, त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कपिल पाटील बोलत होते.
कोळी समाजाला त्यांच्या अधिकाराचा हक्क आपण दिला पाहिजे आणि म्हणून ज्याप्रमाणे आपण जमिनीवर सातबारा देतो त्याप्रमाणे मासेमारी क्षेत्र सागरी क्षेत्रावर सातबारे झाले पाहिजेत, यासाठी स्वायत्त सागरी परिषद निर्माण करावी, अशी मागणी अनिल परब यांच्याकडे करीत असल्याचे त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात परब यांनी मोतीराम भावे यांच्या अनेक आठवणींना उजाळा दिला. 1995 साली माजी खा. दिवंगत मधुकर सरपोतदार यांच्या निवडणुकीपासून आपला मोतीराम भावे यांच्याशी संबंध आला. मच्छीमारांच्या प्रश्नांसाठी लढवय्ये नेते म्हणून त्यांची ख्याती होती. 1973 ते 1992 अशी 19 तब्बल वर्षे नगरसेवक असताना मढ, वेसावे ते अंधेरीपर्यंतच्या परिसराचे त्यांनी नेतृत्व केले आणि या भागाचा विकास करण्याचा प्रयत्न केला, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
------------------------------