मुलांना धोका मोबाइल गेमच्या व्यसनाचा, पालकांनी सावध होण्याची आवश्यकता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 01:56 AM2017-09-03T01:56:53+5:302017-09-03T01:57:17+5:30
सध्याची मुले ही स्पर्धेच्या युगात जगत असल्यामुळे पालक मुलांना आणखीन स्मार्ट करण्याकडे लक्ष देतात. मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी सध्याचा सोपा उपाय म्हणजे, लहान वयातच अगदी पाच, सहा वर्षांच्या मुलांनाही स्मार्ट फोन आणि इंटरनेटचा खुलेआमपणे वापर करायला दिला जातो.
- पूजा दामले
सध्याची मुले ही स्पर्धेच्या युगात जगत असल्यामुळे पालक मुलांना आणखीन स्मार्ट करण्याकडे लक्ष देतात. मुलांना स्मार्ट बनवण्यासाठी सध्याचा सोपा उपाय म्हणजे, लहान वयातच अगदी पाच, सहा वर्षांच्या मुलांनाही स्मार्ट फोन आणि इंटरनेटचा खुलेआमपणे वापर करायला दिला जातो. आमची मुलं इंटरनेट आणि स्मार्ट फोन वापरतात, याचे पालकांना कौतुक असते, पण अगदी अजाणत्या वयात मुलांच्या हाती आपण काय देत आहोत, याचा विचार पालकांनी करायला हवा. ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ या गेममुळे रशियात १५० हून अधिक मुलांनी जीव गमवला आहे. आता या ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ने भारतीयांच्या स्मार्ट फोन्समध्ये शिरकाव करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे आता पालकांनी सावध होण्याची आवश्यकता आहे.
लहान मुले जेवत नाही, हट्ट करतात म्हणून त्याला शांत करण्यासाठी पालकांच्या हातातील मोबाइल नामक खेळणे मुलांच्या स्वाधीन केले जाते. सुरुवातीच्या काळात मुले लांबून मोबाइल पाहात असते, पण जसजसे कळायला लागते, तेव्हापासून मुले मोबाइल वापरायला शिकतात. त्यातली सगळी फंक्शन त्यांना येतात, पुढे इंटरनेट वापरायलाही सुरुवात करतात, अक्षर ओळख झाली की, मुले स्वत: गुगल वापरायला लागतात. अनेक पालकांना याचे कौतुक वाटत असेल, तरीही पालकांनी सावध होण्याची आवश्यकता आहे. मुले व्हिडीओ गेम खेळतात, तसेच अन्य गेम खेळतात, पॉर्न साइट पाहतात. याचाही मुलांवर परिणाम होतो. त्यामुळे पालकांनी विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
रशियातील ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ गेमने भारतात प्रवेश केला आहे. देशातील विविध राज्यांमध्ये शालेय मुलांच्या मोबाइलमध्ये हा गेम दिसल्यावर पालकांचा तणाव वाढला आहे. अंधेरी येथील एका मुलाने ब्लू व्हेल चॅलेंजमुळे आत्महत्या केल्याचे समोर आल्यावर अनेक पालक सावध झाले आहेत, पण या सगळ््यात मुलांचा दोष आहे, असे समजू नका. मुलांना समजवून सांगणे आवश्यक आहे. घरात टेक्नॉलॉजी आल्यामुळे संवाद कमी होत चालला आहे. आपल्या पाल्याला सुरक्षित ठेवण्यासाठी पालकांनी त्यांच्याशी संवाद साधण्याची गरज आहे.
शाळेने पाठविले ई-मेल
रशियातील ब्लू व्हेल चॅलेंज आता देशात पोहोचला आहे. मुंबईसह अन्य राज्यातील शाळांमधील मुलांच्या मोबाइलमध्ये हा गेम आढळून आला आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून बी.डी.सोमाणी इंटरनॅशनल स्कूलने पालकांना ई-मेल पाठविले आहेत. मुलांकडे लक्ष द्या, मुलांचे मोबाइल तपासा, अशा सूचना यात करण्यात आल्या आहेत.
फेसबुक, टिष्ट्वटर,
‘इंस्टा’ बनतोय सापळा
एकाकी असणारी, कमकुवत मनाच्या मुलांना ‘ब्लू व्हेल चॅलेंज’ अॅडमिस्ट्रेटर स्वत: शोधून काढतात. त्यामुळे पालकांनी मुल फेसबुक, टिष्ट्वटर, इंस्टाग्रामसारख्या सोशल नेटवर्किंग साइट्सवरून ब्लू व्हेल चॅलेंजसाठी मुलांची निवड केली जात आहे. सध्या ब्लू व्हेल चॅलेंज हा कोणत्याही साइटवर, अॅपवर उपलब्ध नाही. हा गेम डाउनलोड करण्यासाठी लिंक उपलब्ध नाही. सोशल नेटवर्किंग साइट्सवर विशिष्ट हॅशटॅग वापरले जातात. हे हॅशटॅग वापरल्यास, अॅडमिन त्या व्यक्तीला संपर्क करतो. त्यानंतर, हे मूल खरच हा गेम खेळेल का, याची पडताळणी केली जाते. त्यानंतर, एक लिंक पाठविली जाते. मुलांना ही लिंक डाउनलोड करण्यास सांगितले जाते. त्यानंतरच हा गेम मोबाइलमध्ये येतो. त्यामुळे पालकांनी विशेष काळजी घेतली पाहिजे.
मोबाइल वापरावर मर्यादा
माझी मुलगी मोबाइल वापरते, पण तिला मोबाइल घेऊन दिलेला नाही. माझा मोबाइल ती वापरत असली, तरी आता वापरावर मर्यादा आणल्या आहेत. जास्त वेळ मोबाइल हातात देत नाही. ब्लू व्हेलसारख्या गेममुळे मुलांच्या मनावर आणि पर्यायाने वाढीवर दुष्परिणाम होऊ शकतात. हे पालकांनी लक्षात घेतले पाहिजे.
- लता म्हात्रे, पालक
पासवर्ड टाका
सध्या लहान वयापासून मुलांचा मोबाइलचा वापर वाढला आहे. याचे अनेक दुष्परिणाम आहेत. आता ब्लू व्हेल चॅलेंजसारखा गेम आला आहे. त्यामुळे मोबाइल, इंटरनेट वापराविषयी पालकांमध्ये जागृती करण्यासाठी आम्ही बैठका घेतल्या. मोबाइलला, कॉम्प्युटरला पासवर्ड ठेवा सांगितले आहे, तसेच मुलांनी मोबाइलमध्ये काय पाहिले, कोणत्या साइटवर गेला होता, हे पाहण्यास सांगितले आहे.
- आर. बी. पाटील, प्राचार्य, अभ्युदय हायस्कूल, ज्युनियर कॉलेज आॅफ कॉमर्स
मोबाइल देऊ नका
लहान मुलांच्या हातात मोबाइल देणे चुकीचे आहे. पालकांनी मुलांकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. शाळेत लहान मुलांना मोबाइल वापरण्यास बंदी आहे, तसेच घरीदेखील पालकांनी लक्ष दिले पाहिजे. ब्लू व्हेलप्रमाणेच अन्य गेम्सही विद्यार्थ्यांसाठी धोकादायक आहे. त्यामुळे पालकांनी जबाबदारीने वागले पाहिजे.
- अॅलिस इंबाधन, मुख्याध्यापिका, साधना विद्यालय
पालकांचे वापरावर नियंत्रण हवे
टेक्नॉलॉजी आणि इंटरनेटचे खूप दुष्परिणाम आहेत. सध्या घरातला संवाद कमी झाला आहे. त्यामुळे मुलांना नवीन शब्द कळत नाहीत आणि भावनाही समजत नाहीत. त्यामुळे एक प्रकारे मुलांची वाढ खुंटते. आम्ही पालकांशी संवाद साधतो. पालकांनी मोबाइल वापरावर नियंत्रण ठेवले पाहिजे. मराठी माध्यमात मुलांनी मोबाइल वापराचे प्रमाण कमी आहे, पण तरीही पालकांनी लक्ष द्यायला हवे.
- छाया गाडे, मुख्याध्यापिका, पार्ले टिळक प्राथमिक शाळा
पालकांमध्ये
जनजागृती आवश्यक
गेल्या काही दिवसांत ब्लू व्हेल चॅलेंजमुळे अनेक पालकांच्या मनात भीती निर्माण झाली आहे, पण घाबरून चालणार नाही. त्यामुळे पालकांसाठी जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. पालकांनी मुलांशी कसा संवाद साधावा, मुलांना अन्य अॅक्टिव्हिटीमध्ये कसे गुंतवावे, याविषयी माहिती देण्यात आली आहे.
- अरुंधती चव्हाण, अध्यक्ष, पेरेन्ट्स टीचर्स असोसिएशन
मुलांना बेसिक मोबाइल द्या
मुलांचे वय काय, त्यांच्या गरजा काय, याचा विचार करून पालकांनी मोबाइल दिला पाहिजे. सातवी, आठवीच्या मुलांना मोबाइल हा फक्त संभाषणासाठी आवश्यक असतो. त्यामुळे या मुलांना साधा मोबाइल वापरायला द्यावा. राष्ट्रीय पातळीवर
ब्लू व्हेल चॅलेंजसाठी योग्य उपाययोजना करण्यात आली आहे, पण पाल्य आणि पालकांमध्ये समन्वयाचा अभाव असणे ही शोकांतिका आहे. पाल्याशी मित्रत्वाच्या नात्यातून संवाद साधला पाहिजे. मुलांच्या वर्तवणुकीवर लक्ष ठेवा. मुलांशी संवाद साधल्यास तो कसा विचार करतो, हे सहज समजू शकते.
- डॉ.माधवी शेठ,
कौन्सिलिंग सायकोलॉजिस्ट