देशातील असंतोषाला वाचा फोडण्याची गरज -नंदिता दास
By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2018 04:28 AM2018-09-24T04:28:28+5:302018-09-24T04:28:45+5:30
देशात जे वातावरण सुरू आहे,त्याविरुद्ध असंतोषाला वाचा फोडण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती- दिग्दर्शक नंदिता दास यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई : देशात जे वातावरण सुरू आहे,त्याविरुद्ध असंतोषाला वाचा फोडण्याची गरज असल्याचे मत प्रसिद्ध अभिनेत्री आणि निर्माती- दिग्दर्शक नंदिता दास यांनी व्यक्त केले आहे.
नंदिता यांनी देशातील राजकीय-सामाजिक घडामोडींवर नेहमी भाष्य केले असून, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची पुरस्कर्ती अशी त्यांची ख्याती आहे.
वृत्तसंस्थेशी बोलताना नंदिता म्हणाल्या,‘देश आणि समाजहितासाठी मोठ्या प्रमाणावर जनतेने पुढे यायला हवे. अन्यायाविरुद्ध आवाज उठविणे काळाची गरज आहे. जे लोक अन्यायाविरुद्ध बोलतात त्यांच्यापैकी काहींना कारागृहात डांबले जाते. काहींना जीवे मारले जाते. माझी जवळची मैत्रीण पत्रकार गौरी लंकेश यांचा आवाज असाच संपविण्यात आला. कायद्याच्या चौकटीत मते मांडणे आणि असंतोष व्यक्त करणाऱ्या लोकांना आज मोठी किंमत मोजावी लागते.’
नंदिता यांनी त्यांच्या अलीकडे प्रसिद्ध झालेल्या ‘मंटो’चित्रपटाबद्दल सांगितले की, सहादत सहन मंटो यांच्यारूपाने सद्यस्थितीतील परिस्थिती तपासण्याचा प्रयत्न चित्रपटाद्वारे करण्यात आला आहे. मागच्या शुक्रवारी प्रकाशित झालेल्या चित्रपटात मंटोची मुख्य भूमिका नवाजुद्दीन सिद्दीकी यांनी साकारली आहे.(वृत्तसंस्था)