मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे ड्रीम प्रोजेक्ट अससेल्या बुलेट ट्रेनबाबत अत्यंत रोखठोक भूमिका घेतली आहे. मुंबई-सूरत या बुलेट ट्रेन मार्गाची आवश्यकता आहे, असे मला वाटत नाही. मात्र राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. राज्याची राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या.
राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाला दिलेल्या मुलाखतीचा उत्तरार्ध आज प्रसिद्ध झाला. यामध्ये उद्धव ठाकरे यांनी वादाचा विषय ठरलेल्या बुलेट ट्रेनबाबत आपली भूमिका मांडली. ते म्हणाले की, राज्य म्हणून बुलेट ट्रेनची आवश्यकता असेल तर मी म्हणेन माझ्या मुंबई-नागपूरला जोडणारी बुलेट ट्रेन द्या. माझी राजधानी आणि उपराजधानी जोडणारी ट्रेन द्या. जेणेकरून विदर्भाच्या मनात कारण नसताना जो दुरावा निर्माण करून देण्याचा प्रयत्न होतो. तो दुरावा नष्ट होईल. जसा समृद्धी महामार्ग होतोय. त्याला आता शिवसेनाप्रमुखांचं नाव दिलंय. तसंच मुंबई नागपूर जोडणारी बुलेट ट्रेन द्या, मला आनंद होईल.
मुंबई-सुरत बुलेट ट्रेनची आता आवश्यकता नाही. बुलेट ट्रेन असली तरी बुलेट ट्रेनचा विषय आता बॅकसिटला गेला आहे. त्यावर काही चर्चा झालेली नाही. तसेच कुणी विचारपुसही करत नाही. यावरही आता राज्य सरकारला राज्याच्या हिताचा विचार करून निर्णय घ्यावा लागेल. माझी वैयक्तिक भूमिका वेगळी आहे, ती जनतेसोबत राहण्याची आहे, असेही उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, बुलेट ट्रेनसाठी ज्यांनी स्वत:हून जमीन दिली. त्यांचा व्यवहार आता पूर्ण झालेला असेल. मात्र ग्रामीण भागातील तळागाळातील लोकांचा अजूनही भूसंपादनाला विरोध आहे. त्यांच्यामागे शिवसेना ठामपणे उभी आहे. जसा नाणारचा विषय आहे. नाणारचासुद्धा सरकारने करार केलाच होता. पण तो जनतेने हाणून पाडला. आम्ही शिवसेना म्हणून जनतेसोबत उभे राहिलो. आता सगळ्यांना मान्य असले तर करू करार, असे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.