Join us

"...पण पालिकेत आलो नाही, शेवटी लेकाने मुख्यालयात आणले"; अजित पवारांकडून आदित्य ठाकरेंचे कौतुक

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2021 8:12 AM

मुख्यमंत्री म्हणून महापौरांच्या जागेवर बसेन, असे स्वप्नातही वाटले नव्हते

मुंबई : सव्वाशे वर्षानंतरही भक्कम असलेली महापालिका मुख्यालयाची वास्तू, किल्ले अशा पुरातन वास्तूंचा वारसा मुंबईला लाभला आहे. तो जपणे व पुढे नेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी केले. भिंतीलापण कान असतात, असे बोलले जाते. मात्र उद्यापासून पालिका मुख्यालयातील भिंती बोलू लागतील व आपला इतिहास सांगतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

मुंबई पालिका, महाराष्ट्र राज्य पर्यटन महामंडळाच्या संयुक्त विद्यमाने पालिका मुख्यालयात हेरिटेज वॉक सुरू करण्यात येईल. मुंबईकर व पर्यटकांना या पुरातन वास्तूची सफर घडविणाऱ्या उपक्रमाची सुरुवात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गुरुवारी झाली. जुन्या आठवणींना उजाळा देताना ते म्हणाले की, १४ वर्षांचा असताना मी पहिल्यांदा महापौर निवडणुकीच्या निमित्ताने या वास्तूत आलो होतो. पण मुख्यमंत्री म्हणून महापौरांच्या जागेवर कधी बसेन, असे स्वप्नातही वाटले नव्हते.

पालिका म्हणजे गोंधळ, नगरसेवकांची आरडाओरड असे चित्र होते. यापुढे येथील प्रत्येक भिंत, कोपरा बाेलेल, मुंबई जडणघडणीचा इतिहास सांगतील.  या वास्तूत अनेक थोर व्यक्ती घडले आहेत. येथील हेरिटेज वॉक तो इतिहास जिवंत करतील, असे ते म्हणाले. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे, महापौर किशोरी पेडणेकर, आयुक्त इक्बाल सिंह चाहल उपस्थित होते.

शेवटी लेकाने मुख्यालयात आणले : अजित पवार१९९० पासून विधिमंडळात आहोत, मात्र कधी पालिका मुख्यालयात येण्याचा योग्य आला नाही. शेवटी लेकाने इमारतीत आणले, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आदित्य ठाकरे यांचे कौतुक केले. तसेच हेरिटेज वॉकला मराठी नाव शोधावे, असेही पालिकेला ठणकावले. 

फडणवीस, कंगनाला लगावला टोलामहसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी अभिनेत्री कंगना रनाैतला टोला लगावला. मुंबईला पाकव्याप्त कश्‍मीर म्हणणारेही या शहरात सुरक्षित राहतात. विविध धर्मांचे लोक येथे एकत्र राहतात, असे ते म्हणाले. तर माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्ली मेट्रोमधील त्यांच्या प्रवासाचा फोटो ट्विट करून मुंबईच्या विमानतळावर असे मेट्रोने जाता येईल का, असा प्रश्न केला हाेता. यावर फडणवीस यांनी ज्या मेट्रोमध्ये फोटो काढला, ती मेट्रो कॉंग्रेसने सुरू केली. अशी आठवण करून देत फडणवीस लवकरच नागपूर विमानतळावर मेट्रोनेच जातील अशा शब्दात थाेरात यांनी प्रत्युत्तर दिले. 

...तर फसाल : आजवर जगाला सुरतेची लूट माहिती होती. मुंबईतील ऐतिहासिक संस्था गुजरातला नेण्याचा घाट घातला जात आहे, पण मुंबईला लुटण्याचा प्रयत्न कराल तर फसाल, असा सल्लाही बाळासाहेब थोरात यांनी भाजपला नाव न घेता लगावला.

टॅग्स :अजित पवारउद्धव ठाकरेआदित्य ठाकरेमुंबई महानगरपालिका