पारधी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज
By admin | Published: March 29, 2016 02:05 AM2016-03-29T02:05:43+5:302016-03-29T02:05:43+5:30
पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. परंतु अनेक पारधी कुटुंबांची सरकारदरबारी नोंदच नाही. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीतील
मुंबई : पारधी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना विविध योजनांचा लाभ मिळणे आवश्यक आहे. परंतु अनेक पारधी कुटुंबांची सरकारदरबारी नोंदच नाही. त्यामुळे शिक्षण आणि नोकरीतील सवलतींचा या समाजाला फायदा घेता येत नाही. भटक्या पारधी समाजाचीही नोंद घेतली पाहिजे, त्यांचे प्रश्न समजून घेण्यात यावेत. मुळात पारधी समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे मत ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांनी केले.
फादर अॅन्थोनी डायस आणि दीक्षिता डिकु्रझा लिखित ‘आक्रोश पारध्यांचा’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात ते बोलत होते. शनिवारी मुंबई पत्रकार संघात हा पुस्तक प्रकाशन सोहळा पार पडला. पारधी समाजातील प्रत्येक माणसाच्या कपाळावर गुन्हेगारीचा शिक्का यंत्रणेने मारला आहे. पारधी म्हटले की गुन्हेगारच, अशी मानसिकता समाजात दिसून येते. या पारधी समाजातील प्रश्न, त्यांच्या व्यथा पुस्तकातून मांडण्यात आल्या आहेत.
झेविअर्स महाविद्यालयाच्या संशोधन अभ्यास केंद्राने मुंबईतील पारधी समाजाचा अभ्यास सुरू केला आहे. एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करीत असलेल्या मुंबईतील पारधी समाजातील कुटुंबाकडे वास्तव्याचे कोणतेही ग्राह्य पुरावे नाहीत. उपलब्ध कागदपत्रांच्या आधारे जातीचे दाखले देण्याचा निर्णय असतानाही पारधी समाजाची अडवणूक होताना दिसते. त्यामुळे वर्षानुवर्षे पाठीवर बिऱ्हाड घेऊन फिरणाऱ्या मुंबईतील ७० पारधी कुटुंबांना रेशनकार्डचे वाटप या पुस्तक प्रकाशन समारंभात करण्यात आल्याचे फादर अॅन्थोनी डायस यांनी सांगितले. (प्रतिनिधी)