शिक्षण पद्धतीत बदल होण्याची गरज "

By admin | Published: May 1, 2017 07:02 AM2017-05-01T07:02:57+5:302017-05-01T07:02:57+5:30

देशातील शिक्षण पद्धतीत बदल होण्याची आवश्यकता आहे. समाजात होणाऱ्या बदलांप्रमाणे शिक्षणाची पद्धत बदलल्यास याचा फायदा

The need to change the teaching method " | शिक्षण पद्धतीत बदल होण्याची गरज "

शिक्षण पद्धतीत बदल होण्याची गरज "

Next

मुंबई : देशातील शिक्षण पद्धतीत बदल होण्याची आवश्यकता आहे. समाजात होणाऱ्या बदलांप्रमाणे शिक्षणाची पद्धत बदलल्यास याचा फायदा देशातील तरुणांना होतो. कोरियामध्ये कौशल्यपूर्ण व्यक्तींचे प्रमाण ९३ टक्के तर जर्मनीतल्या कौशल्यपूर्ण व्यक्तींचे प्रमाण हे ९६ टक्क्यांवर आहे, तर आपल्या देशात हे प्रमाण एक आकडी म्हणजे ३ ते ४ टक्के इतके कमी आहे. या गोष्टीचा गांभीर्याने विचार व्हायला हवा. व्यवसायभिमुख अभ्यासक्रमाचे धडे विद्यार्थ्यांना गिरवायला दिले पाहिजेत. यासाठी सकारात्मक प्रस्ताव एकत्र करून मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे पाठविण्याची आवश्यकता असल्याचे मत ‘आर्ट आॅफ लिव्हिंग’चे संस्थापक श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केले.
रविवारी दुपारी एनएससीआय डोममध्ये आयोजित कार्यक्रमात ५ हजार विद्यार्थ्यांशी रविशंकर यांनी संवाद साधला. या कार्यक्रमाला विविध महाविद्यालयांचे २५० मुख्याध्यापक, राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारे खेळाडू, अंध क्रिकेट संघाचे खेळाडू उपस्थित होते. पोलीस, नेव्ही अधिकारी उपस्थित होते. या वेळी तरुण आणि शिक्षण व्यवस्था या विषयावर रविशंकर यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
शिक्षणाप्रमाणेच वागणूक आणि विचारसरणीत बदल होण्याची आवश्यकता आहे. आयुष्यात समतोल साधायला शिकायला पाहिजे. ‘आपण बरोबर आहोत,’ असे म्हणत राहिल्यास नाती तुटू शकतात. कारण गर्व, अहंभाव या वाक्यातून दिसून येतो. आपल्याकडे असणारे ज्ञान दुसऱ्यांना देणे आवश्यक आहे, पण त्या वेळी व्यक्तीचे मन दुखावले जाणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे. त्यामुळे त्या व्यक्तीला न दुखावता चांगल्या गोष्टी समजावून पुढे घेऊन जाणे आवश्यक आहे. यासाठी समतोल साधणे आवश्यक आहे. समतोल हा ध्यान-धारणेतून साधता येतो, असा कानमंत्र रविशंकर यांनी दिला.
आपल्या देशातील व्यक्तींना शिस्त आणि नियमानुसार, काम करण्याची सवय लागणे आवश्यक आहे. दुसऱ्यांचा विचार करायला शिकवले पाहिजे. हे बदल झाल्यास समाजात नक्कीच बदल दिसून येतील. तरुणांची शक्ती योग्य दिशेने नेण्याची सद्यस्थितीला आवश्यक आहे. अनेक तरुण व्यायाम करत नाहीत. त्यामुळे आरोग्यदृष्ट्या ते सुदृढ नाहीत. यामुळे मैदानी खेळ तरुण खेळू शकत नाहीत. त्यामुळे तरुणांची मानसिक आणि शारीरिक वाढ होण्याकडे लक्ष दिले पाहिजे. तरुणांना ध्यान-धारणेची आवश्यकता आहे. त्यामुळे त्यांचे मन एकाग्र होण्यास मदत होईल. एकत्रित येऊन काम केल्यास देशाचा विकास नक्कीच होईल. यासाठी मोठ्या प्रमाणावर जनजागृती व्हायला हवी, असे मत रविशंकर यांनी या वेळी व्यक्त केले. (प्रतिनिधी)

पुराणकाळापासूनचे ज्ञान अंधारात
आपल्या देशाने गणितातील ‘शून्य’ आणि ‘अनंत’ या दोन संकल्पना जगाला दिल्या आहेत, पण आपल्या देशातील शाळांमध्ये हे विद्यार्थ्यांना शिकवले जात नाही. आपणच आपले श्रेय घेत नसल्याने अन्य देशही आपल्याला याचे श्रेय देत नाहीत. तरीही आपण याकडे दुर्लक्ष करीत असल्याचे रविशंकर यांनी स्पष्ट केले.

Web Title: The need to change the teaching method "

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.