Lockdown: मुंबईत संपूर्ण लॉकडाऊनची गरज; महापौर किशोरी पेडणेकर यांची भूमिका 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2021 06:15 AM2021-04-18T06:15:04+5:302021-04-18T06:15:19+5:30

Lockdown in Mumbai:

The need for a complete lockdown in Mumbai: Mayor Kishori Pednekar | Lockdown: मुंबईत संपूर्ण लॉकडाऊनची गरज; महापौर किशोरी पेडणेकर यांची भूमिका 

Lockdown: मुंबईत संपूर्ण लॉकडाऊनची गरज; महापौर किशोरी पेडणेकर यांची भूमिका 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : कोरोना रुग्णांची संख्या मुंबईत वाढत असल्याने राज्य सरकारने १४ एप्रिलपासून राज्यात कडक निर्बंध जारी केले. मात्र, यामध्ये अत्यावश्यक सेवा व काही इतर सेवा आणि उद्योगांना सूट दिली आहे. तरीही सार्वजनिक ठिकाणी लोकांची गर्दी असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सध्याची स्थिती पाहून मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवा, असे मत महापौर किशोरी पेडणेकर यांनी मांडले.
मुंबईत दररोज आठ ते दहा हजार कोरोनाबाधित रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी मुंबईत ३० एप्रिलपर्यंत कडक निर्बंध जारी झाले. ९५ टक्के नियमांचे पालन करतात. तर पाच टक्के उल्लंघन करतात. त्यांच्यामुळे इतरांना अडचण होते. म्हणून मुंबईत संपूर्ण लॉकडाऊन लागू करायला हवे, असे मत महापौरांनी व्यक्त केले.


पालिकेच्या काही रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा तुटवडा
बाेरीवली येथील भगवती रुग्णालयातच नव्हे तर पालिकेच्या अन्य काही रुग्णालयांतही ऑक्सिजनचा तुटवडा जाणवू लागला आहे. कच्च्या मालाचा आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे ऑक्सिजनची निर्मिती कमी प्रमाणात होत असल्याचे समोर आले आहे. याची गंभीर दखल घेत महापौर पेडणेकर यांनी शनिवारी पालिकेच्या काही रुग्णालयांची पाहणी केली. तसेच या तुटवड्यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लिक्विड स्वरूपातील ऑक्सिजन प्लांट बसविण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले.
भगवती रुग्णालयात ऑक्सिजन सिलिंडर कमी असल्याने २५ रुग्णांना शुक्रवारी अन्य रुग्णालयांमध्ये हलवले हाेते. महापौर, आरोग्य समिती अध्यक्षा राजूल पटेल यांनी वांद्रे भाभा, कुर्ला भाभा सर्वसाधारण रुग्णालय तसेच गोवंडीच्या पंडित मदनमोहन मालवीय शताब्दी रुग्णालय व बोरिवलीच्या भगवती रुग्णालयाला भेट देऊन प्रमुख वैद्यकीय अधीक्षक डॉ. प्रदीप जाधव यांच्याशी चर्चा केली.


कुंभमेळ्याहून येणाऱ्यांना क्वारंटाइन
कुंभमेळ्याहून मुंबईत परत येणाऱ्या नागरिकांना क्वारंटाइन करण्याचा विचार सुरू असल्याचे महापौरांनी सांगितले. कुंभमेळ्याहून आपापल्या राज्यात जाणारे लोक सोबत ‘प्रसाद’ म्हणून कोरोना आणत आहेत. या सर्व लोकांना त्यांच्या त्यांच्या राज्यांमध्ये क्वारंटाइन करण्याची गरज आहे. त्याचा खर्च त्या लोकांकडूनच घ्यायला हवा. कुंभमेळ्याहून मुंबईत परतणाऱ्या नागरिकांनाही क्वारंटाइन करण्याचा विचार पालिका करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.

यामुळे ऑक्सिजनचा झाला तुटवडा
भगवती रुग्णालयात शुक्रवारपासून ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे येथील रुग्णालयांच्या आयसीयू विभागातील रुग्ण तसेच ऑक्सिजन लावलेल्या रुग्णांना जम्बो कोविड सेंटरमध्ये दाखल करण्यात आले आहे. कच्च्या मालाचा आवश्यक त्या प्रमाणात पुरवठा होत नसल्यामुळे ऑक्सिजनची निर्मिती कमी प्रमाणात होत असल्याचे ऑक्सिजन पुरवठादाराने यावेळी सांगितले.

आपत्ती काळात हँडी ऑक्सिजनचा पर्याय
अशा आपत्कालीन स्थितीत हँडी ऑक्सिजनचा वापर करण्याचे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले. हँडी ऑक्सिजन हे चार तासांपर्यंत चालत असल्याने आपत्कालीन स्थितीत रुग्णांचा जीव वाचविण्यासाठी उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी लिक्विड स्वरूपातील ऑक्सिजन प्लांट बसविणे, गोवंडीच्या शताब्दी व भगवती रुग्णालयात ऑक्सिजन कॅप्सूल प्लांट सुरू करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करण्याचे निर्देशही महापौरांनी दिले.

दोन दिवसांत समस्या सुटेल
ऑक्सिजन कॅप्सूल प्लांटची प्रक्रिया पूर्ण करण्यापूर्वी केंद्र सरकारच्या पेट्रोलियम अँड एक्स्प्लोसिव्ह सेफ्टी ऑर्गनायझेशनचे ना हरकत प्रमाणपत्र मिळणे आवश्यक असते. हे प्रमाणपत्र मिळाल्यावर गोवंडीतील शताब्दी आणि कुर्ला येथील भाभा रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा पूर्ववत होईल, अशी माहिती आरोग्य समितीचे अध्यक्ष राजूल पटेल यांनी दिली.

आतापर्यंत १ कोटी १८ लाख जणांचे लसीकरण
nमुंबई : राज्यात शुक्रवारी ३ लाख ५६ हजार ६६८ जणांचे लसीकरण करण्यात आले, तर आतापर्यंत एकूण १ कोटी १८ लाख ९५ हजार ३५० जणांना कोविड लस दिल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
nमुंबईत १९ लाख २८ हजार २८७, पुण्यात १६ लाख ९० हजार ८७, ठाण्यात ८ लाख ७८ हजार ९४६, नागपूरमध्ये ७ लाख ८२ हजार ८८०, नाशिकमध्ये ५ लाख २४ हजार ५३ लाभार्थ्यांचे लसीकरण केले. 
nपालिकेच्या माहितीनुसार, मुंबईत आतापर्यंत २ लाख ६३ हजार ४३१ आरोग्य कर्मचाऱ्यांना, २ लाख ९१ हजार ८९४ फ्रंटलाइन कर्मचाऱ्यांना, ६० हून अधिक वय असणाऱ्या ७ लाख ३१ हजार ६९२ तर ४५ हून वय असणाऱ्या ६ लाख ४ हजार १३६ जणांना लस देण्यात आली.

Web Title: The need for a complete lockdown in Mumbai: Mayor Kishori Pednekar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.