सध्या राज्यासह मुंबईतील कोरोनाची स्थिती पाहता कठोर निर्बंधांची गरज आहे. लॉकडाऊन केल्यास गर्दीवर नियंत्रण मिळविता येईल, त्यामुळे लोकांचा वावर कमी झाल्यास निश्चितच रुग्णसंख्या कमी होईल. बाजारपेठा, लोकलच्या वेळा, मॉल, सिनेमागृह येथील प्रवेशावर बंधने घातली पाहिजेत. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याच्या दृष्टीने प्रयत्न केले पाहिजेत. त्यात तात्पुरत्या कोविड केंद्राची उभारणी, कंत्राट पद्धतीवर मनुष्यबळाची भरती, नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे आहे. मात्र, निर्बंधाची सक्ती करीत असताना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा कमी होणार नाही याची काळजी यंत्रणांनी घेतली पाहिजे.
- डाॅ. पार्थिव संघववी, आयएमए सदस्य
* लसीकरण मोहीम व्यापक करण्याची गरज
लॉकडाऊनच्या चर्चेमुळे आधीच लोकांमध्ये घबराट पसरलेली आहे. अशा स्थितीत पूर्णपणे कडक निर्बंध घालताना सामान्यांच्या मूलभूत गरजांचा विचार यंत्रणांनी करावा. मुख्यतः राज्यासह शहरातील लसीकरण मोहीम व्यापक करण्याची अधिक गरज आहे. सार्वजनिक वाहतुकीवर निर्बंध घालणे अत्यावश्यक आहे. त्याचप्रमाणे, आरोग्यसेवा क्षेत्रासाठी भरीव निधी, अत्याधुनिक तंत्रज्ञान, प्रशिक्षित मनुष्यबळ यांची तरतूद करणे आवश्यक आहे. मागील लॉकडाऊनच्या वेळेस मोठ्या प्रमाणात लोकांना मानसिक आरोग्याच्याही समस्या उद्भवल्या होत्या. त्यांच्या निराकरणासाठी हेल्पलाईन, समुपदेशन या पातळ्यांवरही प्रयत्न केले पाहिजेत.
- डॉ. अभिजित मोरे, जनआरोग्य चळवळ, सदस्य
...................................