कोविड-१९ ची साथ आणि संमिश्र चिकित्सेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 30, 2021 04:09 AM2021-04-30T04:09:15+5:302021-04-30T04:09:15+5:30

जगभर येऊन गेलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून अनेक देश सावरले. भारतात मात्र या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवत दैनंदिन रुग्णवाढीचा ...

The need for covid-19 accompaniment and composite therapy | कोविड-१९ ची साथ आणि संमिश्र चिकित्सेची गरज

कोविड-१९ ची साथ आणि संमिश्र चिकित्सेची गरज

Next

जगभर येऊन गेलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेतून अनेक देश सावरले. भारतात मात्र या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवत दैनंदिन रुग्णवाढीचा उच्चांकही मोडला आहे. गेला आठवडाभर दररोज ३ लाखांच्यावर रुग्ण आढळत आहेत. ऑक्सिजन, व्हेंटिलेटर, बेड कमी पडू लागले आहेत. मृत्यूची संख्याही वाढत चालली आहे. पूर्वी काही राज्यात असणारी ही लाट निवडणुका, कुंभमेळा आदी कारणांनी देशभर पसरत आहे. त्यातच बरे होणाऱ्या कोरोना रुग्णात कोरोनामुळे होणारे दुष्परिणाम दिसून येऊ लागल्याने आता ‘पोस्ट कोविड केंद्र, बाह्य रुग्ण विभाग’ सुरू करण्यात आले आहेत. हे कमी म्हणून की काय, अमेरिकन एक अभ्यास गटाने भारतात १० मेपर्यंत कोरोनामुळे दररोज ५,६०० लोकांचा तर १२ एप्रिल ते १ ऑगस्टपर्यंत ६ लाख ६५ हजार लोकांचा मृत्यू होईल, असा अंदाज वर्तविला आहे.

या पार्श्वभूमीवर आयुर्वेदाला कोरोनाच्या उपचारात डावलले जात आहे, ही जनसामान्य लोकांमध्ये असलेली भावना आता आयुर्वेदिक डॉक्टरांमध्ये दिवसेंदिवस दृढ होत चालली आहे. सरकारने आयुर्वेदिक टास्क फोर्स गठित केला. परंतु त्याचा फारसा उपयोग करून घेतला नाही. वास्तविक पाहता काही साथीच्या रोगांत आयुर्वेदिक औषधांचा चांगला उपयोग होतो, हे दिसून आले आहे. उदा. मुंबईत १९७५-७६ साली फार मोठी काविळीची साथ आली होती. सांसर्गिक रोगांसाठी प्रसिद्ध असलेले कस्तुरबा रुग्णालय हतबल झाले होते. तेव्हा पोदार आयुर्वेदिक रुग्णालयात वैद्य अंतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी व पुनर्नवा काढा या औषधांचे प्रयोग करण्यात आला. त्या आजारात या औषधांचा चांगला उपयोग झाला होता. त्याचा संशोधन पेपरही प्रकाशित झाला आहे. अशाच प्रकारची तीव्र साथ साधारणतः १९९२-९३ साली बीड जिल्ह्यात आली होती. तेव्हाही कोणतीही अर्वाचीन चिकित्सा उपलब्ध नसल्याने महाराष्ट्र सरकारने पोदार रुग्णालयातून त्यावर आयुर्वेदिक उपचार करण्यासाठी खास टीम बीडला पाठविली होती. त्या साथीतही आयुर्वेदिक औषधांचा चांगला उपयोग झाला होता.

साधारणतः १९८१-८२ च्या दरम्यान सावंतवाडीमध्ये प्रवाहिकेची साथ आली होती. साथ नियंत्रणात येत नव्हती. सरकारी यंत्रणा हतबल झाली होती. त्याचवेळी पोदारमध्ये एका कार्यक्रमासाठी तत्कालीन आरोग्य सचिव पळनिटकर आले होते. त्यांनी या साथीविषयी सांगितले. परंतु आजच्यासारखा मीडिया त्यावेळी नसल्याने कोणालाच या साथीविषयी माहिती नव्हती. त्यांनी ही जबाबदारी वैद्य अंतरकर यांना दिली. ती साथ कुटजघन वटी व वृद्ध गंगाधर चूर्ण या औषधांनी आटोक्यात आली. स्वाइन फ्लू, चिकुनगुनिया तसेच १९९९ मध्ये आलेल्या तापाच्या साथीतही आयुर्वेदिक औषधांचा चांगला उपयोग होतो, असे दिसून आले आहे.

महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागात आरोग्य सेवेत आयुर्वेदिक डॉक्टरांचे फार मोठे योगदान आहे, हे विसरून चालणार नाही. त्यांचा या साथीत चिकित्सक म्हणून संमिश्र चिकित्सेसाठी कसा उपयोग करून घ्यायचा, हे सरकारने ठरवावे. सामान्यतः म्हटले जाते की, आयुर्वेदिक औषधे पुराव्यावर आधारित नाहीत. परंतु योग्य संधीच मिळाली नाही तर तो कसा तयार होणार? आज कोरोना उपचारात जाणारी औषधे तरी कुठे पुरावाधिष्ठित आहेत? त्याही औषधांचे प्रयोगच सुरू आहेत? ना? रेमडेसिविर, हायड्रोक्सिक्लोरोक्वीन, लोपिनावीर/रिटोनावीर आणि इंटरफेरोन ही औषधे कोविड-१९ वर उपयोगी, गुणकारी नाहीत असे जागतिक आरोग्य संघटनेनेच जाहीर केले आहे. ही सर्व औषधे प्रायोगिक आहेत. आता नुकतेच झायडस कॅडीलाच्या ‘विराफीन’ या औषधाला कोरोनाच्या आपत्कालीन उपचारासाठी मान्यता दिली आहे. हे औषधही रेमडेसिविर या औषधाप्रमाणेच क्रोनिक हिपॅटायटीसवर वापरले जाते. मुळातच हे औषध कॅन्सरविरोधी आहे. याचे जेवढे फायदे आहेत, त्याहीपेक्षा तोटे जास्त आहेत. असे तज्ज्ञच म्हणत आहेत. मग आयुर्वेदिक औषधे का नकोत? झालाच तर फायदाच होईल. नुकसान तर नक्कीच होणार? नाही.

वास्तविक आयुर्वेदिक औषधांची कार्मूकता पाहण्याची ही चांगली संधी आहे. सरकार व तज्ज्ञांनी याचा उपयोग करून घ्यायला हवा. ‘संयुक्त वा संमिश्र उपचार’ कितपत कार्यकारी आहेत हे उपलब्ध सर्व साधनांचा उपयोग करून तपासायला हवे. महाराष्ट्र सरकारने साधारण व मध्यम कोरोना रुग्णांवर आयुष उपचार करण्याची परवानगी दिली ती कोरोना काळजी केंद्र, कोरोना रुग्णालये व कोरोना आरोग्य केंद्र यात भरती असणाऱ्या रुग्णांना त्यांच्या इच्छेनुसार आहे. परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे यात फारसे काम झाले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, त्याचे निर्मूलन करण्यासाठी हे पुरेसे नाही. हे आयुर्वेदिक डॉक्टर ॲलोपॅथी औषधांबरोबरच कोरोनावर उपयुक्त असणारी काही आयुर्वेदिक औषधे वापरून ‘संयुक्त वा समिश्र उपचार’ करू शकतील.

कोरोनाच्या मुख्य चिकित्सेबरोबरच तो बरा झाल्यानंतर जे दुष्परिणाम दिसून येतात त्यावरही परिणामकारक अशी खूप चांगली आयुर्वेदिक औषधे आहेत. उदा. यष्टीमधू, पिंपळी, कुळीथ युष, आरोग्यवर्धिनी, संशमनी वटी, अश्वगंधा वटी इ. सारखी अनेक औषधे कोरोनाबरोबरच कोरोनानंतर होणाऱ्या दुष्परिणामांवरही उपयोगी आहेत. आज गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. काही आयुर्वेदिक औषधे ऑक्सिजनची योग्य पातळी कायम राखतात. उदा. महालक्ष्मी विलास रस, स्वास कास चिंतामणी रस, त्रैलोक्य चिंतामणी रस, बृहत वात चिंतामणी रस अशी बरीच औषधे ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना निश्चित उपयोगी पडतात. हॉस्पिटलमधील उपचारांबरोबरच आयुर्वेदिक औषधे वापरली तर मृत्यूदर व दुष्परिणामही कमी होतात हे दिसून आले आहे. काही संशोधन पेपरही प्रकाशित झाले आहेत. या कोरोना काळात अनेक आयुर्वेदिक डॉक्टरांनी संमिश्र चिकित्सा केली असून त्याचे निकाल उत्साहवर्धक आहेत. ४० वर्षांपूर्वी आम्ही वापरलेल्या औषधांनी गंभीर अवस्थेतील हृदयविकारात चांगला उपयोग होतो, असे दिसून आले आहे. मी रजिस्टार असताना वैद्य अंतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली न्यूमोनिया, उर:स्तोय यावर आयुर्वेदिक औषधांनी उपचार केले होते व ते यशस्वी झाले होते. संमिश्र उपचारांनी चांगला फायदा होतो व कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत हा लाखो डॉक्टरांचा अनुभव आहे.

कोरोनाच्या या महासाथीत काही होमिओपॅथी औषधेही चांगली उपयोगी असल्याचे दिसून आले आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याला लगाम घालण्यासाठी सरकारने आता तरी सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या तर काही वेळा गंभीर रुग्णांतही संमिश्र चिकित्सा करण्यासाठी हवे तर रुग्णांच्या सहमतीने आयुर्वेदिक डॉक्टरांना सहभागी करून घ्यावे.

- डॉ. अंकुश जाधव

(लेखक भारत सरकारच्या आयुष मंत्रालयाचे माजी सहायक संचालक आहेत.)

Web Title: The need for covid-19 accompaniment and composite therapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.