Join us

कोविड-१९ ची साथ आणि संमिश्र चिकित्सेची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 01, 2021 4:05 AM

सरकारने आयुर्वेदिक टास्क फोर्स गठित केला. परंतु त्याचा फारसा उपयोग करून घेतला नाही. वास्तविक पाहता काही साथीच्या रोगात आयुर्वेदिक ...

सरकारने आयुर्वेदिक टास्क फोर्स गठित केला. परंतु त्याचा फारसा उपयोग करून घेतला नाही. वास्तविक पाहता काही साथीच्या रोगात आयुर्वेदिक औषधांचा चांगला उपयोग होतो, हे दिसून आले आहे. उदा. मुंबईत १९७५ - ७६ साली फार मोठी काविळची साथ आली होती. तेव्हा पोदार आयुर्वेदिक रुग्णालयात वैद्य अंतरकर यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यवर्धिनी व पुनर्नवा काढा या औषधांचे प्रयोग करण्यात आला. त्या आजारात या औषधांचा चांगला उपयोग झाला होता. त्याचा संशोधन पेपरही प्रकाशित झाला आहे. अशाच प्रकारची तीव्र साथ साधारणतः १९९२ - ९३ साली बीड जिल्ह्यात आली होती. तेव्हा महाराष्ट्र सरकारने पोदार रुग्णालयातून खास टीम बीडला पाठविली होती. त्या साथीतही आयुर्वेदिक औषधांचा चांगला उपयोग झाला होता.

साधारणतः १९८१ - ८२ च्या दरम्यान सावंतवाडीमध्ये प्रवाहिकेची साथ आली होती. साथ नियंत्रणात येत नव्हती. तेव्हा तेव्हाच्या आरोग्य सचिवांनी वैद्य अंतरकर सर यांना ही जबाबदारी दिली. ती साथ कुटजघन वटी व वृद्ध गंगाधर चूर्ण या औषधांनी आटोक्यात आली. स्वाईन फ्ल्यू , चिकुनगुनिया तसेच १९९९ मध्ये आलेल्या तापाच्या साथीतही आयुर्वेदिक औषधांचा चांगला उपयोग होतो, असे दिसून आले आहे.

महाराष्ट्राच्या शहरी व ग्रामीण भागात आरोग्य सेवेत आयुर्वेदिक डॉक्टरांचे फार मोठे योगदान आहे, हे विसरून चालणार नाही. त्यांचा या साथीत चिकित्सक म्हणून संमिश्र चिकित्सासाठी कसा उपयोग करून घ्यायचा, हे सरकारने ठरवावे. सामान्यतः म्हटले जाते की, आयुर्वेदिक औषधे पुराव्यावर आधारित नाहीत. परंतु योग्य संधीच मिळाली नाही तर तो कसा तयार होणार? आज कोरोना उपचारात जाणारी औषधे तरी कुठे पुरावाधिष्ठित आहेत? त्याही औषधांचे प्रयोग सुरू आहेत? ना? रेमडेसिविर, हायड्रोक्सिक्लोरोक्वीन, लोपिनावीर / रिटोनावीर आणि इंटरफेरोन ही औषधे कोविड-१९ वर उपयोगी, गुणकारी नाहीत असे जागतिक आरोग्य संघटनेनेच जाहीर केले आहे. ही सर्व औषधे प्रायोगिक आहेत. आता नुकतेच झायडस कॅडिलाच्या ‘विराफीन’ या औषधाला कोरोनाच्या आपत्कालीन उपचारासाठी मान्यता दिली आहे. हे औषधे ही रेमडेसिविर या औषधांप्रमाणेच क्रोनिक हिपॅटायटीसवर वापरले जाते. मुळातच हे औषध कॅन्सर विरोधी आहे. याचे जेवढे फायदे आहेत, त्याहीपेक्षा तोटे जास्त आहेत. असे तज्ज्ञच म्हणत आहेत. मग आयुर्वेदिक औषधे का नकोत? झालाच तर फायदाच होईल. नुकसान तर नक्कीच होणार? नाही.

वास्तविक आयुर्वेदिक औषधांची कार्मूकता पाहण्याची ही चांगली संधी आहे. सरकार व तज्ज्ञांनी याचा उपयोग करून घ्यायला हवा. ‘संयुक्त वा संमिश्र उपचार’ कितपत कार्यकारी आहेत हे उपलब्ध सर्व साधनांचा उपयोग करून तपासायला हवे. महाराष्ट्र सरकारने आयुर्वेदिक टास्क फोर्स गठीत केला. परंतु सरकारच्या उदासीनतेमुळे यात फारसे काम झाले नाही. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, त्याचे निर्मूलन करण्यासाठी हे पुरेसे नाही. हे आयुर्वेदिक डॉक्टर ॲलोपॅथी औषध बरोबरच कोरोनावर उपयुक्त असणारी काही आयुर्वेदिक औषधे वापरून ‘संयुक्त वा समिश्र उपचार’ करू शकतील.

कोरोनाच्या मुख्य चिकित्सा बरोबरच तो बरा झाल्यानंतर जे दुष्परिणाम दिसून येतात त्यावरही परिणामकारक अशी खूप चांगली आयुर्वेदिक औषधे आहेत. उदा. यष्टीमधू, पिंपळी, कुळीथ युष, आरोग्यवर्धिनी, संशमनी वटी, अश्वगंधा वटी ,आयुष -६४ इ. सारखी अनेक औषधे कोरोनाबरोबरच कोरोनानंतर होणाऱ्या दुष्परिणामांवरही उपयोगी आहेत. आज गंभीर लक्षणे असणाऱ्या रुग्णांमध्ये ऑक्सिजनची गरज भासू लागली आहे. काही आयुर्वेदिक औषधे ऑक्सिजनची योग्य पातळी कायम राखतात . उदा. महालक्ष्मी विलास रस, स्वास कास चिंतामणी रस, त्रैलोक्य चिंतामणी रस, बृहत वात चिंतामणी रस अशी बरीच औषधे ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांना निश्चित उपयोगी पडतात. हॉस्पिटलमधील उपचारांबरोबरच आयुर्वेदिक औषधे वापरली तर मृत्यूदर व दुष्परिणाम ही कमी होतात हे दिसून आले आहे. काही संशोधन पेपरही प्रकाशित झाले आहेत. या कोरोना काळात अनेक आयुर्वेदिक डॉक्टरांनी संमिश्र चिकित्सा केली असून त्याचे निकाल उत्साहवर्धक आहेत. ४० वर्षांपूर्वी आम्ही वापरलेल्या औषधांनी गंभीर अवस्थेतील हृदयविकार,न्यूमोनिया, उरास्तोय यावर आयुर्वेदिक औषधींचा चांगला उपयोग होतो, असे दिसून आले आहे. संमिश्र उपचारांनी चांगला फायदा होतो व कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत हा लाखो डॉक्टरांचा अनुभव आहे.

कोरोनाच्या या महासाथीत काही होमिओपॅथी औषधे ही चांगली उपयोगी असल्याचे दिसून आले आहे. कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढण्याला लगाम घालण्यासाठी सरकारने आता तरी सौम्य आणि मध्यम स्वरूपाच्या तर काही वेळा गंभीर रुग्णात ही संमिश्र चिकित्सा करण्यासाठी हवे तर रुग्णांच्या सहमतीने आयुर्वेदिक डॉक्टरांना सहभागी करून घ्यावे.