पूजा दामले, मुंबईमुंबईत झालेल्या हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर राज्यात हृदय प्रत्यारोपण होऊ शकते, याविषयीच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. पण अजूनही पुढचा टप्पा गाठायचा आहे. यासाठी चळवळ निर्माण होण्याची आवश्यकता असल्याचे वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अवयवदानाविषयी जनजागृती करण्यासाठी राज्य सरकारने अनेक मार्ग अवलंबिले आहेत. तरीही अवयव प्रत्यारोपण रुग्णांची आणि दात्यांची संख्या अजूनही व्यस्त आहे. त्यासाठी मानसिकता बदलण्याची गरज आहे. तसेच अवयव दानाविषयी लोकांनी पुढाकार घेऊन चळवळ निर्माण होण्याची गरज असल्याचे मत मानवी अवयव प्रत्यारोपण साहाय्यक संचालक केंपी पाटील यांनी व्यक्त केले.ब्रेनडेड रुग्ण शोधणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी प्रत्येक रुग्णालयात आॅगर्न डोनेशन कोआॅर्डिनेटर नेमणे गरजेचे आहे. पण अवयव वेळेत पोहोचण्यासाठी एक स्वतंत्र लेन तयार करण्याची आवश्यकता आहे. यावर आम्ही विचार करत आहोत. यामुळे रुग्णांना वेळेत रुग्णालयात पोहोचण्यास मदत होईल. देहदानाचा टक्का वाढण्यासाठी जनजागृती केली जात आहे, असे सार्वजनिक आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सांगितले. हृदय प्रत्यारोपणासाठी मुंबईत ग्रीन कॉरिडोर करण्यात आला होता. हृदय लवकर इच्छित स्थळी पोहोचावे, यासाठी हे प्रयत्न होते. पण जेव्हा खरेच गरज असते तेव्हा रुग्ण ट्रॅफिकमध्ये अडकून पडतात. हृदयविकाराचा झटका येतो, तेव्हा अनेक रुग्ण हे ट्रॅफिकमुळे लवकर म्हणजे एका तासात रुग्णालयात पोहोचू शकत नाहीत. यामुळे ग्रीन कॉरिडोर आवश्यक असल्याचे मत केईएम रुग्णालयाच्या हृदयविकार विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल केरकर यांनी व्यक्त केले. ब्रेनडेड व्यक्तीकडून ८ जणांना जीवनदान एक निरोगी व्यक्ती ब्रेनडेड झाल्यास त्या व्यक्तीच्या नातेवाइकांनी अवयवदान करण्याची परवानगी दर्शवल्यास ८ जणांना जीवनदान मिळते. तर ४० ते ४२ जणांचा जीवनाचा दर्जा उंचावू शकतो. अवयवदानाविषयी जनजागृती मोठ्या प्रमाणात झाल्यानंतरही काही प्रमाणात अवयवदानाचा टक्का कमी आहे. हा टक्का वाढवण्यासाठी लोकांची मानसिकता बदलण्याची आवश्यकता आहे. रस्त्यांवरील अपघातात तरुण जखमी होतात. अनेकदा त्यांच्या डोक्याला मार लागल्याने ब्रेनडेड होतात. अशा रुग्णांचे अवयवदान करता येऊ शकते.प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सरकारी अथवा महापालिका रुग्णालयात केल्यास पिवळ्या आणि केशरी शिधापत्रिका धारकांना राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेंतर्गत लाभ मिळतो. पण, आतापर्यंत दात्याला या योजनेचा लाभ मिळत नव्हता. नोव्हेंबर महिन्यात पुन्हा सुरू होणाऱ्या योजनेत दात्यालाही लाभ मिळणार असून प्रत्यारोपण शस्त्रक्रियेनंतर फिजिओथेरपीसाठी येणारा खर्च ही त्यांना देण्यात येणार आहे. - डॉ. दीपक सावंत, सार्वजनिक आरोग्यमंत्री
हृदयदानाविषयी जागरूकता निर्माण होण्याची गरज
By admin | Published: August 06, 2015 2:30 AM