निर्वासितांच्या दुःखाबाबत जागरुकता निर्माण होण्याची गरज- चर्चासत्रातील मत
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2017 01:59 PM2017-12-06T13:59:42+5:302017-12-06T14:04:46+5:30
"अरब देशांतील ज्यू निर्वासित आणि त्यांची भारतात निर्वासित म्हणून राहावे लागलेल्या समुदायांशी असलेले समान धागे” या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन काल प्रबोधिनीच्या मुंबईतील कार्यालयात करण्यात आले होते.
मुंबई-३० नोव्हेंबर रोजी पार पडलेल्या ज्यू निर्वासित दिनाच्या निमित्ताने रामभाऊ म्हाळगीचा आंतरराष्ट्रीय विभाग (RMP International) आणि इंडो-इस्रायल फ्रेंडशिप असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने "अरब देशांतील ज्यू निर्वासित आणि त्यांची भारतात निर्वासित म्हणून राहावे लागलेल्या समुदायांशी असलेले समान धागे” या विषयावर एका चर्चासत्राचे आयोजन काल प्रबोधिनीच्या मुंबईतील कार्यालयात करण्यात आले होते.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून इस्त्रायलचे मुंबईतील महावाणिज्यदूत याकोव फिंकलश्टाईन उपस्थित होते. मुख्य वक्ते म्हणून इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातून वरिष्ठ राजदूत म्हणून निवृत्त झालेले झ्वी गाबे खास इस्रायलहून आले होते. चेंबूरच्या स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे विश्वस्त महेश तेजवानी यांनी सिंधी निर्वासितांची, उद्योजिका शक्ती मुन्शी यांनी काश्मिरी पंडितांची आणि ज्येष्ठ वकील रमेश मुधोळकर यांनी बांगलादेशी हिंदूची कथा आणि व्यथा सांगितली. अनय जोगळेकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.
२९ नोव्हेंबर १९४७ रोजी संयुक्त राष्ट्रांनी पॅलेस्टाईनचा ज्यू आणि अरब देशांत विभाजनाचा ठराव केल्यानंतर उसळलेल्या हिंसाचारात अरब देश आणि इराणमध्ये सुमारे २००० वर्षं राहणाऱ्या सुमारे १० लाख ज्यूना राहत्या वस्त्रानिशी घरदार सोडून यावे लागले. राजदूत गाबे यांचा जन्म इराकमध्ये झाला होता. त्यांना १९५१ मध्ये एक बॅग आणि ५० इराकी दिनारांसह आपले दुमजली घर सोडून इस्रायलमध्ये निर्वासितासारखे यावे लागले. पण विपरीत परिस्थितीशी संघर्ष करत ते इस्रायलच्या परराष्ट्र मंत्रालयातील वरिष्ठ पदापर्यंत पोहचले. आपल्या भाषणात राजदूत झ्वी गाबे म्हणाले की, इस्रायलमध्ये राहणाऱ्या अरब जनतेला ज्यू नागरिकांप्रमाणे समान हक्क असून संसदेत १०% अरब समाजाचे प्रतिनिधी आहेत. इस्रायलमध्ये अरब देशांतून निर्वासित म्हणून आलेल्या लोकांची संख्या तेथील एकूण लोकसंख्येच्या सुमारे ५०% असून या सर्व निर्वासितांचे इस्रायलने पुनर्वसन केले आहे. याउलट अरब देशांत निर्वासित म्हणून गेलेल्या पलेस्टिनी निर्वासितांचा तेथील बऱ्याचशा राज्यकर्त्यांनी स्वीकार न केल्याने त्यांना अजूनही हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. जगाला जशी पलेस्टिनी निर्वासितांची कहाणी माहिती आहे तशी अरब जगातील निर्वासितांची कहाणी माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. एकेकाळी १० लाख ज्यू राहणाऱ्या अरब देशात आज ज्यू केवळ नावापुरते उरले आहेत.
महेश तेजवानी यांनी सिंधी निर्वासितांची व्यथा मांडताना सांगितले की, फाळणीच्या वेळी पंजाब आणि बंगाल प्रांताचे विभाजन झाले असले तरी सिंध प्रांत संपूर्णतः पाकिस्तानात गेल्यामुळे सिंधी लोकांना भारतात मिळेल तिथे आसरा घ्यावा लागला. पूर्वी मोठे व्यापारी असलेल्या लोकांना रेल्वेत तसेच फेरीवाल्यांसारखा रस्त्यावर मालाची विक्री करत आयुष्य उभे करावे लागले. अशाही परिस्थितीत सरकारच्या मदतीवर विसंबून न राहता सिंधी लोक आपल्या पायावर उभे राहिले. १९४७ सालापासून त्यांनी भारतात अनेक नावाजलेल्या शिक्षण संस्था, धर्मशाळा, मंदिरं आणि उद्योगाची उभारणी केली. शक्ती मुन्शी यांनी काश्मीरमधील इस्लामचे आगमन, तेथील पंडितांचे झालेले शोषण, फाळणीनंतरही जम्मू आणि लदाखला आणि राज्यातील हिंदू, बुद्ध आणि जम्मूतील मुसलमानांना काश्मीर खोऱ्याकडून सहन करावा लागलेला सावत्रभाव, १९८९साली दहशतवाद्यांच्या धमक्यांमुळे पंडितांवर निर्वासित व्हायची आलेली वेळ, ज्येष्ठ आणि मुलांना त्यातून बसलेला धक्का आणि आजही काश्मीर खोऱ्यातील लोकांकडून आपणच खरे शोषित असल्याचा केला जाणाऱ्या कांगाव्याचे भावस्पर्शी वर्णन केले. अॅड मुधोळकर यांनी इंडोनेशिया, मलेशिया आणि बांगलादेशातील आपल्या प्रवासात तेथील हिंदू अल्पसंख्यांकांच्या विदारक स्थितीचे वर्णन केले. बांगलादेशात राहणाऱ्या हिंदूना भारत पाकिस्तानमधील प्रत्येक युद्ध तसेच भारतात होणाऱ्या दंग्यांची मोठी किंमत चुकवावी लागल्याचे सांगितले. बांगलादेशात कुठलेही सरकार असले तरी तेथील हिंदुच्या परिस्थितीत फारसा फरक पडत नसल्याचे ते म्हणाले. आपल्या सर्वांच्या व्यथा एकसमान असून त्याबाबतच्या स्मृती आपल्या पुढील पिढीत कायम रहाण्यासाठी तसेच जागतिक पातळीवर या विषयावर अधिक प्रमाणात जागरूकता निर्माण करण्यासाठी आपण एकत्र यायची गरज असल्याचे उपस्थितांचे एकमत झाले.