पर्यावरणपूरक पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2020 03:57 PM2020-09-27T15:57:49+5:302020-09-27T15:58:24+5:30
प्रकाश गोळे स्मृती ऑनलाइन चर्चासत्र
मुंबई : अर्थव्यवस्थेत जीडीपी वाढ सामाजिक हिताचा एकमेव निर्देशक असू शकत नाही हे जळजळीत वास्तव सध्याच्या कोविड महामारीमुळे पुन्हा एकदा प्रकर्षाने जगासमोर आले आहे. ह्या जागतिक महामारीतुन बोध घेऊन प्रचलित अनियंत्रित उपभोगतावादी भांडवलशाही अर्थव्यवस्थेत काही मुलभूत बदल करून सर्व समाजहित समावेशक, पर्यावरण पूरक अशी पर्यायी अर्थव्यवस्था निर्माण करण्याची गरज तज्ञांच्या पॅनलनी ऑनलाइन वेबिनारमध्ये प्रतिपादित केली.
इकॉलॉजिकल सोसायटी, पुणे आणि अशोका ट्रस्ट फॅार रिसर्च इन इकॉलॉजी ॲन्ड दी एनव्हायरनमेंट, बंगळूरू ह्यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रकाश गोळे स्मृती ऑनलाइन चर्चासत्र मालिकेत वास्तव समजून घेतानाचे पहिले पुष्प गुंफताना एट्रीचे ज्येष्ठ संशोधन सहकारी पर्यावरण तज्ञ डाॅ. शरदचंद्र लेले, अर्थतज्ञ डॉ. अजित रानडे आणि कल्पवृक्षचे संस्थापक आशिष कोठारी ह्या तज्ञ पॅनलनी नवी अर्थव्यवस्था कशा प्रकारची असावी या विषयावर उहापोह केला.
डॉ. लेले यांनी सूत्रसंचलन करताना, अर्थव्यवस्थेचा निर्देशक म्हणून जीडीपी योग्य की अयोग्य, सामाजिक विषमताचा उगम भांडवलशाहीत आहे का, सत्तेचे केंद्रीकरण, सत्ताधिशांचे भांडवलशाही बरोबरचे अर्थकरण आणि यातुन उदभवणाऱ्या पर्यावरणीय आणि नैसर्गिक संसाधनांच्या समस्या अशा सध्या सगळ्याच देशांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांवर सखोल चर्चा घडवून आणली.
डॉ. रानडे ह्यांनी जीवन आर्युमान, जीवनस्तर, अन्नसुरक्षा, साक्षरता, तंत्रज्ञान विकास म्हणजे फोन, इंटरनेट आणि विजेची उपलब्धता हे विकासाचे द्योतक आहेत, असे मुद्दे मांडताना जपान आणि दक्षिण कोरिया या प्रगत देशांचे उदाहरण दिले.
आशिष कोठारी यांनी औद्योगिकरणातुन रोजगार खरोखरच वाढला आहे का, आर्थिक प्रगतीच्या नावाखाली ६ कोटी भारतीयांचे करण्यात आलेले स्थलांतरण, ग्रामीण भारताची झालेली दयनीय अवस्था, ७० टक्के भारतीय सकस अन्न, स्वच्छ पाणी, कपडा, निवारा ह्या मुलभुत गरजांपासून वंचित असणे, अन्नउत्पादन वाढले असले तरी जमीन, पाणी ह्यांचा खालावलेला स्तर, आर्थिक प्रगतीसाठी होणारा पर्यावरणीय आणि नैसर्गिक संसाधनांचा ऱ्हास ह्या गंभीर समस्यांकडे लक्ष वेधले. तसेच सत्तेचे विकेंद्रीकरण करून ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना देत अपरिहार्यतेतुन शहरांकडे होणारे स्थलांतरण थांबवणे हे आत्मनिर्भरतेचे खरे द्योतक आहे, असे सुचवले.
माधवी फाटक यांनी स्वागत केले. अजय फाटक यांनी चर्चासत्र मालिके मागचा विचार आणि उद्देश समजून सांगितला तर शताक्षी गावडे ह्यांनी आभार प्रदर्शन केले. फ्रेंड्स ऑफ इकॉलॉजिकल सोसायटीच्या सभासदांनी संयोजनात सहभाग घेतला.