वाहतूक हवालदारांची प्रतिमा जनमानसात चांगली करण्याची आवश्यकता - उच्च न्यायालय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 03:21 AM2017-12-22T03:21:37+5:302017-12-22T03:22:00+5:30
वाहतूक हवालदारांची प्रतिमा जनमानसात चांगली करण्याची आवश्यकता आहे, असे म्हणत न्यायालयाने याबाबत वाहतूक विभागाला नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची सूचना गुरुवारी केली.
मुंबई : वाहतूक हवालदारांची प्रतिमा जनमानसात चांगली करण्याची आवश्यकता आहे, असे म्हणत न्यायालयाने याबाबत वाहतूक विभागाला नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्याची सूचना गुरुवारी केली.
वाहतूक हवालदारांबरोबर लोक रस्त्यातच हुज्जत घालतात. त्यातच त्यांचा वेळ जातो. वाहतूक पोलिसांचा सामान्यांनी आदर करावा व त्यांची प्रतिमा जनमानसात चांगली व्हावी, यासाठी जनजागृतीची मोहीम हाती घ्या, अशी सूचना न्या. नरेश पाटील व न्या. एन. डब्ल्यू. सांबरे यांच्या खंडपीठाने वाहतूक विभागाला केली.
वाहतूक विभागात असलेल्या भ्रष्टाचाराबद्दल या विभागातच काही काळ काम केलेले वाहतूक हवालदार सुनील टोके यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. वाहतूक पोलिसांचे रेट कार्डच त्यांनी न्यायालयासमोर सादर केले. याची उच्च न्यायालयाने गांभीर्याने दखल घेत या याचिकेचे जनहित याचिकेमध्ये रूपांतर केले.
उच्च न्यायालयाने नागरिकांनाही सामाजिक जबाबदारीचे भान ठेवण्याचे आवाहन केले. नागरिकांनी स्वत:हूनच शिस्त लावून घेतली पाहिजे. तसेच वरिष्ठांनीही कनिष्ठांवर लक्ष ठेवले पाहिजे. त्यासाठी मोबाइल कार उपलब्ध करा, असे न्यायालयाने म्हटले.