शहरी भागातही कुपोषणमुक्ती योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता - मुख्यमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: July 30, 2019 03:09 AM2019-07-30T03:09:32+5:302019-07-30T03:10:02+5:30

महिला-बालकल्याण क्षेत्रातील महाराष्ट्राच्या कामांचे केंद्रीय मंत्री इराणींकडून कौतुक

Need for effective implementation of malnutrition schemes in urban areas - Chief Minister Fadnavis | शहरी भागातही कुपोषणमुक्ती योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता - मुख्यमंत्री

शहरी भागातही कुपोषणमुक्ती योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीची आवश्यकता - मुख्यमंत्री

Next

मुंबई : कुपोषणाचा मुद्दा हा केवळ आदिवासी किंवा ग्रामीण भागापुरता मर्यादित नाही. शहरी भागातही ही समस्या प्रकर्षाने जाणवत असल्याने त्यासंदर्भातील सर्व योजना या भागातही राबविण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. केंद्रीय महिला व बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी आज मुख्यमंत्री फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेऊन महिला व बालकल्याण क्षेत्रातील विविध समस्यांवर चर्चा केली. कुपोषण आणि मातामृत्यूबाबत या वेळी विशेषत्वाने चर्चा झाली.

‘लोकमत’ने ‘पोषण परिक्रमा’ या वृत्तमालिकेअंतर्गत कुपोषण आणि बालमृत्यूचा प्रश्न सातत्याने लावून धरला आहे. मुख्यमंत्री फडणवीस आणि इराणी यांच्या आजच्या भेटीत महिला व बाल विकासासाठी केंद्र सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणीसंदर्भात सविस्तर चर्चा झाली. महाराष्ट्राचे महिला व बालकल्याण क्षेत्रातील काम उल्लेखनीय आहे. कुपोषणमुक्ती, माता व बाल आरोग्य या आघाड्यांवर उत्कृष्टपणे काम सुरू असल्याचे सांगून इराणी म्हणाल्या, पायाभूत विकास आणि सुविधांप्रमाणेच या क्षेत्रातही आस्थेने काम करण्याची गरज आहे. महाराष्ट्रात या क्षेत्रात आस्थेवाईकपणे काम सुरू आहे. पायाभूत विकास आणि सुविधांप्रमाणेच ही आस्थाबदलाची गोष्ट महत्त्वाची असल्याचे इराणी यांनी स्पष्ट केले. ‘माँ’ या पोषण अभियानातही महाराष्ट्र अव्वल राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. या वेळी स्मार्ट अंगणवाडी, माता-बाल लसीकरण, पॉक्सो अंतर्गत न्यायालयीन प्रक्रिया व कार्यवाही, बाल मृत्युदर रोखण्यासाठीच्या विविध उपाययोजना, जाणीव-जागृतीचे उपक्रम, प्रत्येक जिल्ह्यात महिलांसाठी आधाराश्रमाची उभारणी आदी विषयांवर चर्चा झाली.
या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी केंद्राच्या योजनांच्या बरोबरीने राज्याच्या यंत्रणेने ग्रामीण क्षेत्रासह नागरी भागात महिला व बालकल्याणातील कुपोषण मुक्ती आणि आरोग्याशी निगडित योजना आणखी सक्षमपणे राबविण्याचे आश्वासन दिले. कुपोषणमुक्ती आणि महिला आरोग्याच्या क्षेत्रात राज्यातील यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. त्यामुळे कुपोषणमुक्तीसह बालमृत्यू दर कमी करण्यात यश आले आहे. केंद्राप्रमाणेच राज्याच्या यंत्रणेनेही नागरी भागात विशेषत्वाने काम करण्याची गरज आहे. नागरी भागात या योजना सक्षमपणे राबविल्यास आणखी प्रभावी कामगिरी नोंदविता येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.
याप्रसंगी महिला व बालकल्याण विभागाचे केंद्रीय सचिव पवनार, प्रधान सचिव भूषण गगराणी, राज्याच्या सचिव आय. ए. कुंदन, एकात्मिक बाल विकास प्रकल्पाच्या आयुक्त
इंद्रा मालो, अजय खेरा आदी उपस्थित होते.

पंकजा मुंडे यांची अनुपस्थिती
च्कुपोषणासह महिला व बालकल्याण विभागाच्या योजनांच्या महाराष्ट्रातील अंमलबजावणीसंदर्भात ही बैठक होती. कुपोषणाचा विषयच बैठकीचा अजेंडा होता. मात्र, या बैठकीस राज्याच्या
महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडेच उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.
च्यावर, ही बैठक थेट मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्र्यांमध्येच होती. मुख्यमंत्री कार्यालयाने याबाबतचे अन्य सोपस्कार पार पाडले. मुख्यमंत्री आणि इराणी यांच्या दोहोंमधील ही भेट असल्याने
पंकजा मुंडे उपस्थित नसल्याची माहिती सूत्रांनी दिली.
 

Web Title: Need for effective implementation of malnutrition schemes in urban areas - Chief Minister Fadnavis

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.