'पर्यावरणाविषयी आस्था वाढणे गरजेचे'

By admin | Published: January 15, 2017 02:23 AM2017-01-15T02:23:25+5:302017-01-15T02:23:25+5:30

मुंबईकर नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी आस्था वाढवावी तसेच झाडे, फुले, फळे आणि भाज्या याविषयी अधिकाधिक प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका

'Need to Enrich the Environment' | 'पर्यावरणाविषयी आस्था वाढणे गरजेचे'

'पर्यावरणाविषयी आस्था वाढणे गरजेचे'

Next

मुंबई : मुंबईकर नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी आस्था वाढवावी तसेच झाडे, फुले, फळे आणि भाज्या याविषयी अधिकाधिक प्रेम वृद्धिंगत व्हावे, यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण दरवर्षी मोठ्या प्रमाणात झाडे, फुले, फळे आणि भाज्यांचे प्रदर्शन आयोजित करीत असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख यांनी केले. प्रदर्शनात मोठ्या संख्येने संस्थांनी सहभाग घेतला असून, नागरिकांसाठी १३ ते १५ जानेवारीपर्यंत प्रदर्शन खुले राहणार आहे.
वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान (राणीबाग), डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्ग, भायखळा (पूर्व), मुंबई येथे बृहन्मुंबई महानगरपालिका व वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २२व्या झाडे, फुले, फळे, भाज्यांचे प्रदर्शन आणि उद्यानविद्या विषयक कार्यशाळेचे उद्घाटन महापालिका आयुक्त अजय मेहता यांच्या हस्ते पार पडले.
त्या वेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. याप्रसंगी उप आयुक्त (आपत्कालीन व्यवस्थापन) डॉ. किशोर क्षीरसागर, उप आयुक्त सुधीर नाईक, उप आयुक्त रमेश पवार, उप आयुक्त (परिमंडळ-१) सुहास करवंदे, ई विभागाचे सहायक आयुक्त किशोर देसाई, उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित
होते.
या वेळी अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) संजय देशमुख म्हणाले की, महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणातर्फे मागील २१ वर्षांपासून हे प्रदर्शन प्रतिवर्षी भरविण्यात येते. दरवर्षी या प्रदर्शनात नावीन्य व कल्पकता असते.
‘डिस्ने वर्ल्ड’ या संकल्पनेवर आधारित या वर्षी हे प्रदर्शन आयोजित करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रदर्शनाचा लाभ जास्तीतजास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक व वृक्ष अधिकारी जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. (प्रतिनिधी)

७० हजार मुंबईकरांनी दिली भेट
- हे प्रदर्शन पाहायला बच्चेकंपनीसोबतच आजी-आजोबांचीही मोठी गर्दी दिसून येत आहे. शुक्रवार व शनिवार या दोन दिवसांत ७० हजारांपेक्षा अधिक नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट दिली.
- या प्रदर्शनाचा आज शेवटचा दिवस असणार असून, हे प्रदर्शन सकाळी ८ ते रात्री ८पर्यंत नागरिकांसाठी विनामूल्य खुले असणार आहे, अशी माहिती उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी दिली.

Web Title: 'Need to Enrich the Environment'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.