मुंबई : वाचकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी ‘फेक न्यूज’चे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे, असे रोखठोक मत ज्येष्ठ पत्रकार विल्यम मार्क टुली यांनी येथे व्यक्त केले. मुंबई प्रेस क्लबच्या पुरस्कार वितरण समारंभात टुली यांना शुक्रवारी ‘जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. लोकमत मुंबईचे विशेष प्रतिनिधी यदु जोशी आणि ‘मुंबई मिरर’चे प्रिन्सिपल करस्पॉन्डन्ट चैतन्य मारपकवार यांना संयुक्तपणे ‘मुंबई स्टार रिपोर्टर’ पुरस्काराने गौरवण्यात आले. देशभरातील ३० पत्रकारांना सन्मानित करण्यात आले.नरिमन पॉर्इंट येथील एनसीपीए सभागृहात झालेल्या समारंभात ‘मिरर नाऊ’ चॅनेलच्या कार्यकारी संपादक फेय डिसूझा रेडइंकच्या सर्वोत्कृष्ट पत्रकाराच्या मानकरी ठरल्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष सी. के. प्रसाद यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले. अभिनेत्री तापसी पन्नू हिची कार्यक्रमाला विशेष उपस्थिती होती.टुली म्हणाले की, मला कुणी पुन्हा टीव्ही आणि रेडियोमध्ये काम करण्याची संधी दिली तर मी रेडिओमध्ये काम करण्यास प्राधान्य देईन. कारण ते एक स्वतंत्र परिणामकारक माध्यम आहे. रेडिओतील व्यक्ती फक्त आपल्याशीच बोलत असल्याचे श्रोत्यांना वाटत राहते. भारतीयांनी आपल्याला खुल्या मनाने स्वीकारले याबद्दल आपण कृतज्ञ असल्याचे ते म्हणाले. भ्रष्टाचारांच्या जुन्या प्रकरणांचा पुन्हा नव्याने मागोवा घेण्याचा सल्लाही त्यांनी माध्यमांना दिला.
मान्यवरांच्या उपस्थितीत परिसंवाद‘न्यूज मीडियामध्ये बिझनेस आहे का?’ या विषयावरील परिसंवादात लोकमत एडिटोरियल बोर्डचे चेअरमन विजय दर्डा, क्वांटिलियन मीडिया प्रायव्हेटचे संस्थापक-अध्यक्ष राघव बहल, द इंडियन एक्सप्रेस ग्रुपचे कार्यकारी संचालक अनंत गोएंका आणि स्क्रोल मीडियाचे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी समीर पाटील यांनी विचार मांडले.विजय दर्डा म्हणाले की, सामान्य माणसाशी नाळ जुळवून त्यांची पाठराखण करीत लोकमत सर्वसामान्यांचा आवाज बनल्यानेच आजही क्रमांक एकचे वृत्तपत्र आहे. आम्ही धर्मनिरपेक्ष चेहरा नेहमीच टिकविला व त्यासाठी कोणतीही तडजोड स्वीकारली नाही. माध्यमांना व्यवसायाची बाजू सांभाळावीच लागेल, पण त्याचवेळी आपली बांधिलकी ही वाचकांशी आणि संपादकीय मजकुराशी आहे याचेही भान ठेवावे लागेल. हे भान कायम असल्याने वृत्तपत्रांची विश्वासार्हता आजही आहे. संपादकीय सहकाऱ्यांवर विश्वास ठेवतच आजवर लोकमतने वाटचाल केली आहे, असे ते म्हणाले. लोकमतने जपलेल्या सामाजिक बांधिलकीची उदाहरणे त्यांनी दिली.कित्येकवेळा बातम्यांसाठी जाहिरातींवर पाणी सोडावे लागल्याचे राघव यांनी स्पष्ट केले. विश्वासार्हतेसाठी काही महसूल गेला, तरी विश्वासार्हतेमुळेच संस्था चिरकाळ टिकू शकते, असेही असे ते म्हणाले. माध्यमांमध्ये मोठा नफा कमवता येत नसला, तरी त्यात तोटा नक्कीच नसल्याचे मत समीर पाटील यांनी व्यक्त केले. जर तुमची संस्था तोट्यात सुरू असेल, तर नक्कीच तुमचे कुठेतरी चुकतेय, हे ध्यानात घेण्याचा सल्ला पाटील यांनी दिला. जग बदलण्याच्या इराद्याने या क्षेत्रात आलेल्या पत्रकारांनी मोठ्या वेतनाची अपेक्षा ठेवू नये, असे गोएंका यांचे म्हणणे होते. या क्षेत्रात असलेल्या दबावाकडेही त्यांनी लक्ष वेधले. एकंदरीतच सर्वच मान्यवरांनी बदलत्या काळानुसार न्यूज मीडियाने आपल्या कामाची पद्धत बदलण्यावर एकमत दर्शवले.उत्तम पत्रकारितेला संरक्षण हवेच!उत्तम पत्रकारितेला वेतन आणि नोकरीच्या संरक्षणाची हमी संस्थेच्या प्रमुखांनी द्यायलाच हवी, असे ठाम मत कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व प्रेस कौन्सिल आॅफ इंडियाचे अध्यक्ष सी. के. प्रसाद यांनी मांडले. न्यूज मीडियाच्या ताळेबंदाचा अभ्यास केला असता, बहुतेक माध्यमे ही नफ्यात सुरू असल्याचे निदर्शनास येते. योग्य वेतन आणि नोकरीच्या हमीशिवाय उत्तम पत्रकारिता होऊच शकत नाही, असेही प्रसाद यांचे म्हणणे होते.पत्रकारांना अपग्रेड करावे लागेल!बदलत्या काळानुरूप न्यूज मीडियामध्ये बदल होत आहे. त्यामुळे पत्रकारांनाही अपग्रेड करावे लागेल. जशी गुंतवणूक यंत्रामध्ये केली जाते, तशीच गुंतवणूक पत्रकारांचा आयक्यू वाढवण्यासाठी करावी लागेल. उपाशी पोटी भजन होत नाही, त्याचप्रमाणे पत्रकारांच्या गरजा लक्षात घ्याव्या लागतील.- विजय दर्डा, चेअरमन, लोकमत एडिटोरियल बोर्ड