मुंबई : महापालिकेतर्फे राबविण्यात येत असलेल्या स्वच्छता मोहिमेत प्रत्येक घटकाने पुढाकार घेऊन सहभागी व्हावे, असे आवाहन राज्याचे कौशल्य विकास, उद्योजकता आणि नावीन्यता मंत्री तथा मुंबई उपनगरे जिल्हा पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी केले. पालिकेकडून रविवारी ‘एम’ पूर्व आणि ‘एम’ पश्चिम विभागात डीप क्लिनिंग मोहीम राबविण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून विविध विभागांमध्ये डीप क्लिनिंग सुरू आहे. या मोहिमेअंतर्गत गोवंडी स्थानक (पूर्व) ते गावदेवी चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक (पांजरापोळ सर्कल), शनी मंदिर, गोवंडी पूर्व, नारायण गणेश आचार्य उद्यान (डायमंड गार्डन), स्वातंत्र्यसैनिक उद्यान (चिमणी गार्डन), चेंबूर आदी भागात सखोल स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.
शासन, प्रशासन आणि लोकसहभागातून ही मोहीम व्यापक चळवळ बनली आहे. इतक्यावरच समाधानी न होता ही मोहीम अविरत आणि सक्षमपणे सुरू राहण्यासाठी प्रत्येक घटकाने चोखपणे लक्ष द्यावे, अशी सूचना अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी केली.
मुंबईतील मोठ्या रस्त्यांची ज्याप्रमाणे व्यापक स्तरावर अत्यंत सूक्ष्म पद्धतीने स्वच्छता केली जात आहे, अगदी त्याचप्रमाणे गल्लीबोळातील रस्ते स्वच्छ करण्याची कार्यवाही यापुढे करण्यात येईल.- डॉ. इकबाल सिंह चहल, आयुक्त तथा प्रशासक, मुंबई महापालिका