लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - सध्याच्या काळात समाजात वाढणारे व्यसन, दुःख यांना नियंत्रित करण्यासाठी, समाज स्वास्थ्यासाठी आध्यात्मिक चिकित्सा गरजेची आहे. प्रामाणिकपणा, पारदर्शकता, अंहिसा आणि दयेतून ही चिकित्सा साध्य होते, त्यासाठी ध्यानयोग केला पाहिजे. राग, दुःख यावरही मात करण्यासाठी आतून शांत राहणे, संयम राखणे शिकायला हवे. त्याचप्रमाणे, तरुण पिढीला लागलेल्या अमली पदार्थांच्या व्यसनाला आळा घालण्यासाठी खबरदारी ही सर्वांत पहिली पायरी आहे, हे ओळखले पाहिजे, त्या दिशेने काम होणे गरजेचे आहे, असे मोलाचा सल्ला आचार्य श्री महाश्रमनजी यांनी दिला.
अणुव्रत विश्व भारती सोसायटी आयोजित ' एलिव्हेट एक्सपिरिअन्स द रिअल हाय ' या मोहिमेंतर्गत मंगळवारी मरीन लाईन्स येथील बिर्ला मातोश्री सभागृहात ' से येस टू लाईफ - नो टू ड्रग्स ' हा उपक्रम पार पडला. त्यावेळी, आचार्य श्री महाश्रमनजी यांनी उपस्थितांना संबोधित केले. हा उपक्रम केवळ शारिरीक, मानसिक स्वास्थ्य नव्हे तर त्या पलीकडे जाऊन भावनिक स्वास्थ्याचाही समतोल साधण्यासाठी आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले. या कार्यक्रमासाठी आयोजक व बाॅम्बे रुग्णालयाचे डॉ. गौतम भन्साळी, सहपोलीस आयुक्त ( कायदा व सुव्यवस्था) सत्यनारायण चौधरी, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. इक्बाल चहल, बाॅम्बे रुग्णालयाचे अध्यक्ष बी.के तापारिया, एमएमआरसी आयुक्त अश्विनी भिडे, अभिनेते सुनील शेट्टी, संगीतकार अनू मलिक, एलआयसीचे अध्यक्ष सिद्धार्थ मोहंती, ज्येष्ठ व प्रसिद्ध फिजिशिअन डॉ. फारुख उदवाडिया, बाॅम्बे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस.व्ही खाडीलकर, एमएमआरडीएचे आयुक्त डॉ. संजय मुखर्जी इ. उपस्थिती दर्शविली होती.
अमली पदार्थांचे व्यसन ही समस्या अत्यंत गंभीर असून १५ ते २५ वयोगटात व्यसनाधीनता झपाट्याने वाढत आहे. उडता पंजाब पुरते चित्र मर्यादित राहिले असून महाराष्ट्रातही तरुण, प्रौढ वयोगटातील व्यसन वाढत आहे. आजच्या उपक्रमाची व्याप्ती मोठी असून येत्या काळात याचा विस्तार राज्यासह मुंबईत होणार आहे. आतापर्यंत ४ हजार स्वयंसेवक जोडले गेले आहेत, तर ५० हून अधिक शाळांत जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात आला आहे, अशी माहिती बाॅम्बे रुग्णालयाचे डॉ. गौतम भन्साळी यांनी दिली.
कबुतरांना खाद्य घालू नका; डॉ. फारुख उदवाडिया यांची सूचना
जैन समुदायाकडून कबुतरांना मोठ्या प्रमाणावर खाद्य घातले जाते. मात्र कबुतरांपासून श्वसनविकारांसह, फुफ्फुसांचेही गंभीर आजार होण्याचा धोका असतो. त्यामुळे जैन समुदायाने कबुतरांना खाद्य घालणे बंद केले पाहिजे, अशी सूचना डॉक्टरांनी केली. त्याचप्रमाणे, बदललेली जीवनशैली ही आजार , व्यसनांना आमंत्रण देणारी असल्याने त्यामुळे दैनंदिन जीवनशैलीत बदल केले पाहिजेत. मागील काही वर्षांत पालक - मुलांमधील हरवलेला संवादही व्यसनाधीनतेला कारणीभूत आहे. हे चित्र बदलण्यासाठी पालकत्त्व जपले पाहिजे, मुलांचे भावविश्व समजून घेतले पाहिजे.
धार्मिक संस्थांनीही व्यसनमुक्तीबाबत पुढाकार घेतला पाहिजे
अमली पदार्थांच्या व्यसनाची समस्या सर्व वर्गांमध्ये आढळते. अशा स्थितीत यावर मात करण्यासाठी लोकसहभागाचीही गरज आहे. त्याचप्रमाणे, धार्मिक संस्थांनीही व्यसनमुक्तीबाबत पुढाकार घेऊन आवाहन केले पाहिजे. मुंबई पोलीसांनी यंदा वर्षभऱात १२०० प्रकरणांचा निपटारा केला आहे, तर या कालावधीत ४५० कोटींच्या अंमली पदार्थ जप्त केले आहेत. या मोहिमेचा भाग म्हणून शहर उपनगरातील ३ हजार टपऱ्यांवर कारवाईदेखील केली आहे.