Join us  

‘चाइल्ड लाइन’ला गरज मदतीची

By admin | Published: May 24, 2014 1:55 AM

रेल्वे स्थानकांवर सापडलेली मुले, बालकामगार, बाललैंगिक शोषण पीडित आणि भिक्षेकरी मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणार्‍या चाइल्ड लाइनलाच मदतीची गरज आहे.

चेतन ननावरे, मुंबई - रेल्वे स्थानकांवर सापडलेली मुले, बालकामगार, बाललैंगिक शोषण पीडित आणि भिक्षेकरी मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणार्‍या चाइल्ड लाइनलाच मदतीची गरज आहे. पालिकेने सुरक्षेच्या कारणास्तव केशवसुत उड्डाणपुलाखालील चाइल्ड लाइनच्या मध्यवर्ती कार्यालयावर हातोडा चालवला आहे. मात्र संस्थेला जवळच पर्यायी जागा उपलब्ध न केल्याने येथील मुले पुन्हा वाममार्गाला जाण्याची भीती निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या महिला व बालविकास मंत्रालयाच्या चाइल्ड लाइन या प्रकल्पाचे काम युवा संस्था गेल्या दोन वर्षांपासून करत असल्याची माहिती युवा संस्थेचे सामाजिक कार्यकर्ते जगदीश पाटणकर यांनी दिली. केशवसुत उड्डाणपुलाखाली संस्थेचे मध्यवर्ती कार्यालय होते. या ठिकाणी रस्त्यावर किंवा प्लॅटफॉर्मवर सापडलेली मुले, कचरावेचक, बालमजूर, बाललैंगिक शोषणाचे बळी ठरलेले आणि भीक मागून जीवन जगणार्‍या मुलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम सुरू होते. मात्र सुरक्षेच्या कारणास्तव पालिकेने या कार्यालयावर हातोडा चालवल्याने येथील मुलांना मुख्य प्रवाहात आणण्याच्या कामातही मोठा अडथळा निर्माण झाल्याचे पाटणकर यांनी सांगितले.