लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात हेरिटेज ट्री मोठ्या प्रमाणावर आहेत. उद्यानात मोठया प्रमाणावर हेरिटेज ट्री आहेत. पावसाळी झाडे आहेत. मात्र, विकासाची कामे करताना हेरिटेज ट्री असो किंवा इतर झाडे त्यांना मोठ्या प्रमाणावर इजा होते. परिणामी, अशी झाडे कोसळतात आणि पर्यावरणाचे संवर्धन होण्याऐवजी नुकसान होते. या कारणात्सव किंमत करता येणार नाही, अशा प्राणवायू आपल्या देणाऱ्या हेरिटेज ट्रीसह प्रत्येक झाडाचे संवर्धन झाले पाहिजे, असे पर्यावरण अभ्यासकांनी सांगितले.
नागरी भागात नवीन वृक्षांची लागवड करण्याबरोबरच अस्तित्वात असलेल्या वृक्षांचे जतन व संवर्धन करणे, तसेच प्राचीन व अतिप्राचीन वृक्षांचे संरक्षण करून वनसंपत्ती वाढविणे ही काळाची गरज आहे, तसेच कुठल्याही पायाभूत सुविधा वाढविण्याकामी अथवा नवीन पायाभूत सुविधा निर्माण करताना, त्याचे आरेखन वृक्षांचे जतन करून पायाभूत सुविधा/प्रकल्प राबविले जाणे आवश्यक आहे. मुळातच हेरिटेज ट्री एक चांगली कल्पना आहे. आपल्याकडे खूप हेरिटेज ट्री आहेत. मात्र, अनेक वेळा विकासाची कामे करताना अशा प्रकरणांत हानी पोहोचते किंवा त्याकडे दुर्लक्ष केले जाते, अशी खंत व्यक्त करत धर्मेश बरई यांनी सांगितले की, एखादी इमारत पुनर्विकासात गेली आणि तिथे जुने झाड असेल, तर काहीच विचार केला जात नाही आणि ते झाड कापले जाते, झाडांचा बळी जातो, असे होता कामा नये. हेरिटेज ट्री जगणे गरजेचे आहे. एखादे झाडे पन्नास ते साठ वर्षांपासून आहे. त्या झाडाने पुष्कळ प्राणवायू दिलेला असतो. वातावरण थंड ठेवण्यासाठी एखाद्या झाडाने खूप काम केलेले असते. याची किंमत कधीच करता येत आहे. म्हणून हे झाड जपणे गरजेचे आहे. केवळ हेरिटेज ट्री असे नाही, तर प्रत्येक झाड जपले पाहिजे. मुंबईसारख्या शहरात विशेषत: दक्षिण मुंबईत आपण पाहिले, तर दहा टक्केही झाडे नाहीत. असे अनेक परिसर आहेत, जिथे लोकसंख्या खूप आहे, पण झाडे नाहीत. अशा ठिकाणी पावसाळ्यात झाडे लावली जातात. मात्र, या झाडांचे संवर्धन होत नाही. येथे आपण कमी पडतो.
एखादे झाड लावले, तर परिसराने त्याची काळजी घेतली पाहिजे. पर्यावरण दिनापुरती झाडे लावली आणि आपले काम संपले असे होते नाही. हेरिटेज ट्री जोपासणे आणि इतर झाडे जोपासणे हे आपले काम आहे. जांभूळ, वड, पिंपळ अशा झाडांना रस्त्यांच्या कामांत इजा होते. कंत्राटदारांना याची नीट माहिती नसल्याने ते नीट काम करत नाहीत. झाडाला संरक्षण दिले पाहिजे. त्याच्या मुळांना कापता कामा नये. मुळांना इजा होता कामा नये. असे झाले तर जुनी झाडे कोसळतात. कारण झाड उंच वाढलेले असते. मात्र, त्याची मुळे भक्कम नसतात. हेरिटेज ट्री वाचवायचे असेल, तर मुंबई महापालिकेच्या उद्यान विभागाने प्रत्येक झाड वाचविले पाहिजे. प्रत्येक वेळी महापालिकेने काम केले पाहिजे, असे नाही नागरिकांनी पुढाकार घेतला पाहिजे, असाही सूर धर्मेश बरई यांनी लगावला.
---------------
हेरिटेज ट्री संकल्पना
१) ५० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाचे वृक्ष हे हेरिटेज ट्री (प्राचीन वृक्ष) म्हणून परिभाषित
२) स्थानिक वृक्ष प्राधिकरणाद्वारे दर पाच वर्षांनी वृक्षांची गणना
३) स्थानिक प्रजातींच्या झाडांची लागवड आणि जतन
४) वृक्षांची छाटणी शास्त्रोक्त पद्धतीने
५) शास्त्रीय पद्धतीने वृक्षारोपण करण्यास प्रोत्साहन
६) मियावाकी वृक्षारोपण, अमृत वन, स्मृती वन, शहरी वने या पद्धतींचा अवलंब