प्रासंगिक : शेफाली परब-पंडितझपाट्याने विकसित होणाऱ्या शहराचे नियोजनही दूरगामी असणे आवश्यक आहे़ मात्र महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे आज अनेक नागरी व पायाभूत सुविधांचा बोजवारा उडाला आहे़ पाणीपुरवठ्याने यापूर्वीच मुंबईच्या तोंडचे पाणी पळविले आहे़ त्यात आता कचरा समस्येने भर घातली आहे़ कचऱ्याच्या या डोंगराला वारंवार लागणाऱ्या आगीमुळे देवनार डम्पिंग ग्राउंडच्या रूपाने पूर्व उपनगर गॅसवर आहे़मुंबईची लोकसंख्या वाढली तशीच कचऱ्याचे ढीगही टनावरी वाढत आहेत. आजच्या घडीला मुंबईत दररोज साडेनऊ हजार मेट्रिक टन कचरा तयार होतो़ यामध्ये ई-कचरा, जैविक कचरा आणि बांधकाम साहित्याच्या रूपाने डेब्रिजच्या कचऱ्याने भर घातली आहे़ हा कचरा सामावून घेण्यासाठी अवघे तीन डम्पिंग ग्राउंड उरले आहेत़ त्यापैकी दोन डम्पिंग ग्राउंडची क्षमता यापूर्वीच संपुष्टात आली आहे़ कचरा टाकण्यासाठी पर्यायी जागांची व्यवस्था होत नसल्याने मुंबईत कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे़ त्यामुळे कचरा तयार होतो, त्याच ठिकाणी त्याची विल्हेवाट लावणे हाच एकमेव पर्याय उरला आहे़निवासी सोसायट्यांमध्ये कचरा वर्गीकरणाची सक्ती करून दशक उलटले तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होऊ शकलेली नाही़ कचऱ्यापासून वीजनिर्मिती हा कागदावरच राहिलेला प्रयोग़ कचऱ्यावर पुनर्प्रक्रिया करण्यासाठी साडेतीन हजार कोटी खर्च करण्याचा प्रकल्प काही वर्षांपूर्वी तयार झाला़ मात्र या प्रकल्पामध्ये काम कमी आणि आरोपच जास्त झाले़ परिणामी कचऱ्याची समस्या जैसे थेच आहे़ त्यात आता देवनार डम्पिंग ग्राउंडवर वारंवार लागणाऱ्या आगीच्या घटनांनी पालिकेची डोकेदुखी वाढवली आहे़ भंगार माफिया, कचरावेचक, बांधकाम माफिया, बेकायदा झोपड्या या सर्व घटकांमुळे देवनार डम्पिंग ग्राउंडचा भडका उडू लागला आहे़ ही आग लागते की लावण्यात येते, याचे सत्य अजून उघड झालेले नाही़ देवनारच्या आगीमुळे राजकीय वाद पेटला आहे़ मात्र सत्य बाहेर आणण्यात राजकीय व प्रशासकीय इच्छाशक्ती दिसून येत नाही़ पुढच्या वर्षी महापालिका निवडणुका असल्याने या आगीचे भांडवल करून राजकीय कचराफेक सुरू झाली आहे़ डम्पिंग ग्राउंडवर प्रवेशबंदीचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे़ या परिसरात प्रवेशबंदी पूर्वीपासून होती़ मात्र त्याची कधी प्रभावी अंमलबजावणी करण्यात आली नाही़ आता समस्येने उग्ररूप धारण केल्यानंतर पालिकेची झोप उडाली आहे़ देवनारवरील आगीची समस्या सोडविण्यासाठी पालिकेने अनेक उपाययोजना आता आखल्या आहेत़ मात्र एवढ्याने प्रश्न सुटणार नसून ही उपाययोजना कागदावरच न राहता प्रत्यक्षात त्यावर काटेकोर अंमल होणे अपेक्षित आहे़ कचराप्रश्न सोडविण्याची जबाबदारी जेवढी महापालिकेची आहे, तेवढीच मुंबईकरांचीही़ आपल्या आवारात कोणालाच कचरा नको असतो़ पण हा प्रश्न सोडवायचा असल्यास ओला व सुका कचरा वेगळा करणे काळाची गरज आहे़ ओल्या कचऱ्यावर सोसायटीच्या आवारात पुनर्प्रक्रिया करण्याची सूचना महापालिकेने केली आहे़ अशा छोट्या प्रकल्पांमध्ये नागरिकांनीही उत्साह दाखविल्यास ही समस्या सुटण्याचा मार्ग सापडेल़देवनारच्या आगीवर तोडगादेवनार डम्पिंग ग्राउंडवर वारंवार आग लागण्याची घटना घडत आहे़ ही आग विझविण्यासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागते़ त्यामुळे डम्पिंग ग्राउंड परिसरातच चार ते पाच बोअरवेल खणण्यात येणार आहेत. यापैकी दोन बोअरवेल खणण्यात आल्या असून या पाण्यानेच यापुढे आग विझविण्यात येणार आहे, अशी माहिती आयुक्त अजय मेहता यांनी आज दिली़मिथेन गॅस जमा करण्याचा प्रयोगदेवनार डम्पिंग ग्राउंडवरील कचऱ्याच्या डोंगराखालील मिथेन वायूमुळे कचऱ्याला आग लागत आहे़ यावर आयआयटी मुंबई आणि निरी या संस्थांचा सल्ला घेऊन पालिकेने गॅस पाइपमध्ये जमा करण्यास सुरुवात केली आहे़ तसेच कचऱ्याच्या ढिगाऱ्यावर मातीचे आच्छादन करण्यात येत असल्याची माहिती आयुक्तांनी दिली़
देवनारसाठी आता काटेकोर उपाययोजना राबवण्याची गरज!
By admin | Published: April 03, 2016 3:52 AM