‘हास्ययोग’ शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करणे गरजेचे, ग्लोबल लाफ्टर योगा मूव्हमेंटची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2019 04:55 AM2019-05-05T04:55:14+5:302019-05-05T04:55:26+5:30
गेल्या काही वर्षांत बदललेली जीवनशैली आणि स्पर्धात्मक युगामुळे ताणतणाव वाढतोय, यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती तणावमुक्तीसाठी मार्ग शोधत आहे.
- स्नेहा मोरे
मुंबई - गेल्या काही वर्षांत बदललेली जीवनशैली आणि स्पर्धात्मक युगामुळे ताणतणाव वाढतोय, यामुळे प्रत्येक वयोगटातील व्यक्ती तणावमुक्तीसाठी मार्ग शोधत आहे. परिणामी, तरुण पिढीपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांनीच मागील काही वर्षांत योग साधना, व्यायाम असे मार्ग अंगीकारले आहेत. याच तणावमुक्तीचे बाळकडू लहानपणापासून मिळावे यासाठी ग्लोबल लाफ्टर योगा मूव्हमेंटने चार वर्षांपूर्वी शैक्षणिक अभ्यासक्रमात हास्ययोग विषयाचा समावेश करण्यासाठी प्रस्ताव सादर केला होता. परंतु, या प्रस्तावाला चार वर्षे उलटली असून अजूनही तो धूळ खात पडल्याचे वास्तव ‘जागतिक हास्य दिना’च्या निमित्ताने उघडकीस आले आहे.
आंतरराष्ट्रीय पातळीवर केंब्रिज विद्यीपाठात, जपानच्या अभ्यासक्रमात हास्ययोगविषयी अभ्यासक्रम आहे. त्याचप्रमाणे, सीबीएसई बोर्डातही दहावीला हास्ययोगविषयी धडा आहे. याच पार्श्वभूमीवर या विषयाची गरज ओळखून ग्लोबल लाफ्टर योगा मूव्हमेंटचे डॉ. मदन कटारिया यांनी आयुष संचालनालयाला सर्व स्तरांतील शैक्षणिक अभ्यासक्रमात ‘हास्ययोग’चा समावेश करावा, असा प्रस्ताव दिला होता.
याविषयी शासनाने उदासीनता दाखवली असून प्रस्तावाबद्दल कोणताही प्रतिसाद दिला नसल्याचे ग्लोबल लाफ्टर योगा मूव्हमेंटचे डॉ. मदन कटारिया यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.
वैफल्यग्रस्त अवस्थेतून
बाहेर पडणे शक्य
हास्ययोगांत सिंहमुद्रा, प्राणायाम, कपालभाती, दीर्घश्वसन या सर्वांचा अंतर्भाव असल्याने आपोआप अशुद्ध वायूचे निर्वाहन व शुद्ध प्राणवायूचे शरीरात आवाहन या क्रिया होतात. मनाला प्रसन्नता लाभल्याने अनेक ज्येष्ठांच्या शारीरिक व्याधी दूर करण्यास मदत होते. त्यामुळे वैफल्यग्रस्त अवस्थेतून बाहेर पडून त्यांना आनंदी व उत्साही वाटते, असे हास्ययोगचे महत्त्व सांगताना डॉ. कटारिया यांनी सांगितले. हे महत्त्व ओळखून ‘हास्ययोग’ शैक्षणिक अभ्यासक्रमात समाविष्ट करणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
डॉ. कटारिया म्हणाले की...
हसणे संसर्गजन्य आहे. इतरांना हसताना पाहून आपोआप आपल्यालाही हसू फुटते. हे हसू निरागस बालकाच्या हास्यासारखे निर्व्याज असते. सध्या ताणतणाव लहानग्यांनाही आहे. फक्त त्यांना तो व्यक्त करता येत नाही वा त्यातून मार्ग काढता येत नाही, अशा वेळी हे बाळकडू शालेय पातळीवर मिळाल्यास समाजस्वास्थ्यासाठी उपयुक्त ठरेल.