घरे विकण्यामागे नेमकी कारणे काय, हे जाणून घेण्याची गरज
By ऑनलाइन लोकमत | Published: March 2, 2020 06:12 AM2020-03-02T06:12:18+5:302020-03-02T06:12:24+5:30
गिरणी कामगारांनी घरे विकून मुंबईबाहेर जाऊ नका, अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातली.
मुंबई : गिरणी कामगारांनी घरे विकून मुंबईबाहेर जाऊ नका, अशी भावनिक साद मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घातली. मात्र, आमच्याकडे घरे विकण्यावाचून पर्याय नसतो. जर खरोखरच गिरणी कामगारांनी घरे विकू नयेत असे वाटत असेल, तर त्यामागची कारणे जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे मत गिरणी कामगारांनी यावेळी व्यक्त केले.
गिरणी कामगार घरे विकून मुंबई बाहेर फेकले जाण्यामागे विविध कारणे आहेत, नोकरी गेल्याने गिरणी कामगारांची आर्थिक परिस्थिती चांगली नसते. जर हे घर घ्यायचे असेल, तर कर्ज काढावे लागते. कर्ज काढले, तर हप्ते कसे फेडायचे, असा प्रश्न त्यांच्यासमोर असतो. त्यामुळे त्यांना अखेर हे घर विकावे लागते, असे बॉम्बे डाइंग मिलचे विजेते गिरणी कामगार संतोष मोरे हे म्हणाले.
‘सोडतीत घर लागल्याच्या खूपच आनंद झाला. मात्र, आमच्यासोबत घरांसाठीच्या प्रत्येक आंदोलनात, बैठकीत सहभागी असलेल्या प्रत्येकाला जोपर्यंत हक्काचे घर मिळत नाही, तोपर्यंत खरा आनंद होणार नाही आणि तोपर्यंत आमचा लढा सुरूच राहील. आता हक्काचे घर मिळाल्याने मोठ्या घरात जाण्याचा आनंद होत आहे,’ असेही मोरे म्हणाले.
>जेव्हा सोडतीत नाव जाहीर झाले, तेव्हा मला खूप आनंद झाला, मिल बंद झाल्यापासून सांताक्रुझ भागात लहानशा घरात मुलांसोबत राहतो. आता स्वत:चे हक्काचे घर मिळाल्याने हक्काच्या घरात जाण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे.
- अनिता अनंत मालवणकर, विजेता, गिरणी कामगार वारस
लॉटरीतील घरांच्या वाटपातील तफावतीविषयी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार एकच मालक असलेल्या वाडिया यांच्या स्प्रिंगमिल कामगारांसाठी २,५०० घरे तर टेक्स्टाइल मिलच्या कामगारांसाठी अवघी ७२० घरे ही तफावत का? दोन्ही मिलचे मालक एकच असताना घरांच्या वाटपात तफावत कशासाठी, याची मिल कामगारांना माहिती मिळणे आवश्यक आहे.
- अशोक राजाराम धाडवे, गिरणी कामगार
सर्वात पहिल्यांदा काढण्यात आलेल्या सोडतीत माझा प्रतीक्षायादीमध्ये १८४वा क्रमांक होता. आतापर्यंत चार वेळा सोडत काढण्यात आल्या. मात्र, एकदाही नाव यादीत आले नाही. आता यापुढे काय माहीत कधी नशीब उघडेल आणि घराचे स्वप्न पूर्ण होईल.
- जटाशंकर तिवारी, गिरणी कामगार