- सागर नेवरेकर चौपाटीवर फिरायला गेल्यानंतर अनेक जण खाद्यपदार्थांचे रॅपर व तत्सम कचरा तेथेच फेकतात अन् निसर्गाच्या अनमोल ठेव्याला जणू कचऱ्याचे ग्रहण लागते. हे पाहून २१ वर्षीय मल्हार कळंबे अस्वस्थ झाला आणि चौपाटीसोबतच नदी परिसरातील कचरा उचलण्याची मोहीम त्याने हाती घेतली. मित्रांच्या साथीने गेल्या दोन वर्षांत त्याने दादर चौपाटीवरून एक हजाराहून अधिक टन, तसेच मिठी नदी येथून सुमारे ३०० टन कचरा गोळा केला. त्याच्या या सामाजिक कार्याची दखल संयुक्त राष्टÑांनीही घेतली. त्याला यूएनतर्फे व्ही अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. या उपक्रमाबाबत मल्हारशी केलेली बातचीत...
प्रश्न : दादर चौपाटी स्वच्छ करण्याची कल्पना कशी सुचली?उत्तर : जुलै, २०१७ साली इंडोनिशियातील बाली येथे फिरायला गेलो होतो. तेथील समुद्र किनारे अत्यंत स्वच्छ होते. तेथून परतल्यावर मुंबईतील अस्वच्छ समुद्र किनारे पाहून वाईट वाटले. याबाबत आईशी बोललो. ती म्हणाली वाईट वाटून काही होणार नाही. त्यापेक्षा स्वत: जाऊन समुद्र किनारे साफ कर. तिचे म्हणणे मला पटले. एकट्याने हे काम करणे शक्य नव्हते. त्यामुळे मित्रांची मदत घेतली. पहिल्याच रविवारी आम्ही अंदाजे १९ ते २० जण जमलो आणि दादर चौपाटी येथून आमच्या ‘बीच प्लीज’ या स्वच्छता मोहिमेची सुरुवात झाली.प्रश्न : ‘बीच प्लीज’ मोहिमेला कोणाकोणाची मदत मिळाली?उत्तर : ‘बीच प्लीज’ मोहिमेमध्ये ९० टक्के सहभाग शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थी घेतात. आमच्या मोहिमेशी काही खासगी कंपन्या जोडल्या असून त्यांचे लोक रविवारी दादर चौपाटीवर येतात. ज्यावेळी आम्ही चौपाटी स्वच्छ करायला घेतली, तेव्हा त्यांनी दुर्लक्ष केले. मात्र, युवासेनेचे अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी मदतीचा हात दिला. युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांनीही खूप मदत केली.प्रश्न : दादर चौपाटीसह मिठी नदीही स्वच्छ करावी, असे का वाटले?उत्तर : दादर चौपाटी स्वच्छ करताना येथील समुद्रात येणारा ९० टक्के कचरा हा मिठी नदीतून येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळेच नोव्हेंबर, २०१८ मध्ये आम्ही मिठी नदी क्लीनअप ही मोहीम सुरू केली. दादर चौपाटी व मिठी नदीलगत राहणारे अजूनही स्वच्छता मोहिमेकडे दुर्लक्ष करतात, याची खंत वाटते.
कार्याचा सन्मानमल्हार हा दर शनिवारी दादर चौपाटी आणि दर रविवारी मिठी नदी स्वच्छ करतो. या कामात त्याला त्याचे मित्रही मदत करतात. मल्हारला आॅक्टोबर, २०१८ मध्ये मुंबईतील संस्थेतर्फे ‘आय व्हॉलिंटिअर’ अवॉर्ड मिळाले असून, यूएनतर्फे ‘व्ही अवॉर्ड’ हे डिसेंबर, २०१८ साली मिळाले. फेब्रुवारी, २०१९ मध्ये रायगड जिल्हा परिषद आणि नरवीर तानाजी मालुसरे चॅरिटेबल ट्रस्ट यांच्यातर्फे ‘तानाजी मालुसरे’ पुरस्काराने त्याला सन्मानित केले.
एकूण कच-यापैकी ९० टक्के प्लॅस्टिकआतापर्यंतच्या स्वच्छता मोहिमेमध्ये ९० टक्के प्लॅस्टिक कचरा जमा करण्यात आला. कचºयामध्ये सर्वात जास्त प्लॅस्टिक पिशव्या आढळून आल्या. आता दिवसाला २० टन प्लॅस्टिक कचरा गोळा केला जातोय. समजा, प्लॅस्टिक वस्तू वापरल्याच नाहीत, तर इतका कचरा गोळा होणार नाही.भविष्य तरुणांच्या हाती आहे. युवापिढीला कचरा समस्येची जाणीव करून द्यायला हवी. त्यामुळेच जास्तीत जास्त तरुणांना मोहिमेत सहभागी करून घेणे हेच आमचे ध्येय आहे.