खराब हवेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज; पर्यावरणवाद्यांचे मत
By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 05:37 AM2019-11-14T05:37:25+5:302019-11-14T05:37:34+5:30
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तब्बल तीन वेळा आढावा घेऊन स्वच्छ हवेसाठीचा सुधारित कृती आराखडा तयार करत हवेच्या गुणवत्तेसाठी प्रयत्नशील असल्याचा दावा केला.
मुंबई : महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने तब्बल तीन वेळा आढावा घेऊन स्वच्छ हवेसाठीचा सुधारित कृती आराखडा तयार करत हवेच्या गुणवत्तेसाठी प्रयत्नशील असल्याचा दावा केला. प्रत्यक्षात पर्यावरणवाद्यांनी याबाबत समाधान व्यक्त केलेले नाही. ‘वातावरण फाउंडेशन’च्या म्हणण्यानुसार, मंडळाने अद्यापही हवा प्रदूषणाच्या मुद्द्याकडे गांभीर्याने पाहिले नसून, हवेच्या गुणवत्तेसाठी आणखी प्रयत्नशील राहण्याची गरज आहे.
‘वातावरण फाउंडेशन’चे संस्थापक अध्यक्ष भगवान केशभट यांच्या म्हणण्यानुसार, मुंबई शहर आणि उपनगरातील वायू प्रदूषित करत असलेल्या कारखान्यांबाबत प्रशासनाने कठोर कार्यवाही केली पाहिजे. विशेषत: चेंबूर आणि ट्रॉम्बे परिसरात होत असलेल्या वायुप्रदूषणाबाबत प्रशासनाने कठोर पावले उचलणे गरजेचे आहे.
फाउंडेशनच्या म्हणण्यानुसार, मंडळाने कृती आराखडा समाधानकारक बनविला नाही. आराखड्यात त्रुटी आहेत. वाहनांमुळे होणारे प्रदूषण, औद्योगिक प्रदूषण याचा नीट विचार आराखड्यात केलेला नाही. ग्रीन बसचा विचार करणे गरजेचे आहे. सार्वजनिक वाहतुकीचा गांभीर्याने विचार केला पाहिजे. पुरेशा मार्गदर्शक तत्त्वांच्या आधारे प्रदूषणाची माहिती दिली पाहिजे.
आॅनलाइन सर्वेक्षण
मुंबई आणि आसपासच्या परिसरातील हवेची गुणवत्ता सुधारावी याकरिता ‘वातावरण फाउंडेशन’ने एक आॅनलाइन सर्वेक्षण हाती घेतले आहे. या अंतर्गत नागरिकांना वातावरणाशी निगडित प्रश्नांची उत्तरे द्यावयाची आहेत, अशी माहिती ‘वातावरण फाउंडेशन’कडून देण्यात आली.
>केव्हा बसेल प्रदूषणास आळा?
सार्वजनिक वाहतूक सेवेमध्ये शुद्ध इंधनाचा वापर केलेल्या बस, विशेषत: इलेक्ट्रिक (विद्युत) बसची वाढ होईल यावर जोर दिल्यास तसेच शहरात सायकलसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध केल्यास प्रदूषण कमी होईल.
इमारत बांधकाम करणे, पाडणे आणि कचरा हाताळणे यांच्यासंबंधी केलेल्या नियमांचे पालन केल्यास प्रदूषण कमी होईल, असे मत पर्यावरणवाद्यांनी व्यक्त केले.