देशातील वातावरण मुलांसाठी अधिक पूरक बनविण्याची गरज - अमृता फडणवीस
By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2019 04:29 AM2019-06-23T04:29:44+5:302019-06-23T04:30:08+5:30
देशातील वातावरण लहान मुलांसाठी अधिक पूरक बनविण्याची गरज आहे. देशात लहान मुलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे.
मुंबई - देशातील वातावरण लहान मुलांसाठी अधिक पूरक बनविण्याची गरज आहे. देशात लहान मुलांचे मृत्यू होण्याचे प्रमाण जास्त आहे. हे प्रमाण कमी करणे आवश्यक आहे. आजारांमुळे कोणत्याही लहान मुलाचा जीव जाता कामा नये, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी केले़
मिशन मुस्कान प्रकल्प महाराष्ट्र सरकारचा मुख्यमंत्री वैद्यकीय मदत विभाग आणि रोटरी इंटरनॅशनलच्या वंचित मुलांसाठीच्या मोफत बालरोग शस्त्रक्रिया अभियानाच्या संयुक्त पुढाकाराने बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज येथे नुकताच पुरस्कार वितरण सोहळा पार पडला, त्यावेळी त्या बोलत होत्या़
मिशन मुस्कान प्रकल्पांतर्गत मागील ११ महिन्यांत १ हजारहून अधिक हृदयशस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. एक हृदय प्रत्यारोपण, दोन यकृत प्रत्यारोपण, ५ कोक्लियर प्रत्यारोपण आणि कर्करोगासाठी
तीन बोन मॅरो प्रत्यारोपण शस्त्रक्रियांचाही समावेश आहे. यासाठी २० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
खेड्यापाड्यातील मुलांना तातडीने वैद्यकीय मदत देण्याचा हेतू
मिशन मुस्कानअंतर्गत सर एच. एन. रिलायन्स फाउंडेशन हॉस्पिटल, एसआरसीसी हॉस्पिटल, एसआरसीसी हॉस्पिटल, नानावटी हॉस्पिटल, रहेजा हॉस्पिटल, ज्युपिटर हॉस्पिटल, वॉकहार्डट हॉस्पिटल, कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटल, बालाजी हॉस्पिटल, अपोलो हॉस्पिटल, फोर्टीस हॉस्पिटल आणि पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटल या हॉस्पिटलशी करार करण्यात आला आहे.
बालरुग्णाच्या कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे वार्षिक उत्पन्न १ लाख ६० हजार रुपयांपेक्षा कमी असायला हवे, असे तहसीलदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र असावे. वैद्यकीय अहवाल आणि संबंधित हॉस्पिटल डॉक्टरांचे पत्र असावे, कुटुंबातील सदस्यांचे आधार कार्ड व शिधापत्रिका उपलब्ध असावी. मिशन मुस्कानअंतर्गत उपचार घेण्यासाठी बाल रुग्णाला ही पात्रता पूर्ण करणे गरजेचे आहे.
मुख्यमंत्री मदत निधी आणि रोटरी इंटरनॅशनल यांनी एकत्र येऊन ‘मिशन मुस्कान’ या प्रकल्पासाठी परस्पर सहकार्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. महाराष्ट्रातील खेड्यांपाड्यातील मुलांना वैद्यकीय मदत तातडीने मिळण्यासाठी, बालरोग शस्त्रक्रिया करण्यासाठी या संयुक्त उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देशातील महत्त्वाच्या उद्योगपतींना मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी मदत करण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद म्हणून या कार्यक्रमात अमृता फडणवीस यांच्याकडे ३ कोटी रुपयांचे धनादेश सुपुर्द करण्यात आले आहेत, तर ७ कोटी रुपये देण्याचे आश्वासन उद्योजकांनी दिले. या कार्यक्रमात अभिनेता विवेक ओबेरॉय, फॅशन डिझायनर अर्चना कोचर उपस्थित होते.