राज्यात ऑनलाईन विद्यापीठाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 5, 2021 04:11 AM2021-09-05T04:11:18+5:302021-09-05T04:11:18+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई कोविड परिस्थितीत शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रात आणि समाजातील विविध घटकांमध्ये ज्ञानाचा प्रसार, प्रचार करण्यासाठी ऑनलाईन तंत्रज्ञानाचे ...

The need for an online university in the state | राज्यात ऑनलाईन विद्यापीठाची आवश्यकता

राज्यात ऑनलाईन विद्यापीठाची आवश्यकता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

कोविड परिस्थितीत शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रात आणि समाजातील विविध घटकांमध्ये ज्ञानाचा प्रसार, प्रचार करण्यासाठी ऑनलाईन तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ऑनलाईन शिक्षण हे कठीण परिस्थितीत शिक्षणाची गुणवत्तावाढ आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण परवडण्यासारखे आहे शिवाय ज्यांना दूरस्थ शिक्षण घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऑनलाईन विद्यापीठाच्या नव्या संकल्पनेची आणि त्या पार्श्वभूमीवर त्याची अमलबजावणी करण्यासाठी तशा विद्यापीठाची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव युवासेनेमार्फत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्यासमोर सादर करण्यात आला आहे. युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि इतर सदस्यांनी राज्यात अशा ऑनलाईन विद्यापीठाची स्थापना व्हावी अशी मागणी या प्रस्तावाद्वारे केली आहे.

कोविड काळात मागील २ वर्षांपासून राज्यातील शैक्षणिक संस्था बंद आहेत. या परिस्थितीत ऑनलाईन शिक्षण सुरु असून अनेक विद्यार्थ्यांना हे शिक्षण परवडण्यासारखे नसल्याने, नेटवर्क व इंटरनेटची समस्या असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. मात्र सुरक्षिततेच्या पार्श्वभूमीवर हा योग्य उपाय असून अनेक विद्यार्थ्यांना मूळ गावी जाऊनही ऑनलाईन शिक्षण प्रणालीमुळे शिक्षण प्रवाहाशी जुळून राहता आले असल्याचेही विसरता येणार नाही.

अनेक विद्यार्थी जे शाळांत, शैक्षणिक संस्थांमध्ये पोहचू शकत नव्हते त्यांनी ऑनलाईन पद्धतींनी आपले शिक्षण सुरू ठेवले आहे. त्यामुळे ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा विद्यार्थ्यांना उपयोग ही मोठ्या प्रमाणावर झाला असल्याचे दुर्लक्षित करता येणार नाही. या शिवाय जर ऑनलाईन विद्यापीठाची स्थापना करून विद्यार्थ्यांना त्याची सुविधा उपलब्ध झाल्यास तेथे प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य नसल्याने विद्यापीठ शुल्काव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था, प्रवास याबाबतीतही अधिकचा खर्च होणार नसून आर्थिक दिलासा मिळू शकेल. त्यामुळे राज्यातील ऑनलाईन विद्यापीठाबाबत विचार व्हावा अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे.

ऑनलाईन विद्यापीठ का ?

ऑनलाईन शिक्षण हे नवीन पिढीचे साधन आहे. यामध्ये विद्यार्थी कुठेही, केव्हाही त्याच्या वेळेनुसार, घरबसल्या आणि कमी खर्चात हवे ते शिक्षण घेऊ शकणार आहे. या प्रकारच्या विद्यापीठातून मोठ्या प्रमाणात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होऊन याच माध्यमातून शहरातील दर्जेदार संस्थांमधील शिक्षण ग्रामीण भागापर्यंतही पोहचविता येणे शक्य होईल.

Web Title: The need for an online university in the state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.