Join us

राज्यात ऑनलाइन विद्यापीठाची आवश्यकता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 04, 2021 4:10 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोना काळात शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रात आणि समाजातील विविध घटकांमध्ये ज्ञानाचा प्रसार, प्रचार करण्यासाठी ऑनलाइन ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना काळात शिक्षणाच्या सर्वच क्षेत्रात आणि समाजातील विविध घटकांमध्ये ज्ञानाचा प्रसार, प्रचार करण्यासाठी ऑनलाइन तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. ऑनलाइन शिक्षण हे कठीण परिस्थितीत शिक्षणाची गुणवत्ता वाढ आणि विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावू शकते. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण परवडण्यासारखे आहे, शिवाय ज्यांना दूरस्थ शिक्षण घ्यायचे आहे, अशा विद्यार्थ्यांसाठी पूर्णतः ऑनलाइन विद्यापीठाच्या नव्या संकल्पनेची आणि त्या पार्श्वभूमीवर त्याची अंमलबजावणी करण्यासाठी विद्यापीठाची आवश्यकता असल्याचा प्रस्ताव युवासेनेमार्फत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांच्यासमोर सादर करण्यात आला. युवासेना सचिव वरुण सरदेसाई आणि इतर सदस्यांनी राज्यात अशा ऑनलाइन विद्यापीठाची स्थापना व्हावी, अशी मागणी या प्रस्तावाद्वारे केली आहे.

कोविड काळात राज्यातील शैक्षणिक संस्था बंद असल्यातरी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना पायाभूत सुविधांच्या अभावामुळे हे शिक्षण परवडण्यासारखे नाही, नेटवर्क व इंटरनेटची समस्या असल्याने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होते. मात्र, गेल्या दोन वर्षांत अडचणींवर मात करीत, ग्रामीण भागातलाही विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीमुळे शिक्षण प्रवाहात राहू शकला. त्यामुळे ऑनलाइन शिक्षण प्रणालीचा विद्यार्थ्यांना उपयोग मोठ्या प्रमाणावर झाल्याकडे दुर्लक्षित करता येणार नाही.

या शिवाय जर ऑनलाइन विद्यापीठाची स्थापना करण्यात आली, तसेच विद्यार्थ्यांना त्याची सुविधा उपलब्ध झाल्यास, प्रत्यक्ष उपस्थिती अनिवार्य नसल्याने विद्यापीठ शुल्काव्यतिरिक्त, विद्यार्थ्यांची राहण्याची व्यवस्था, प्रवास याबाबतीतही अधिकचा खर्च होणार नाही. याने विद्यार्थ्यांना आर्थिक दिलासा मिळू शकेल. त्यामुळे राज्यातील ऑनलाइन विद्यापीठाबाबत विचार व्हावा, अशी मागणी युवासेनेकडून करण्यात आली आहे.

ऑनलाइन विद्यापीठ का?

ऑनलाइन शिक्षण हे नवीन पिढीचे साधन आहे. यामध्ये विद्यार्थी कुठेही, केव्हाही त्याच्या वेळेनुसार, घरबसल्या आणि कमी खर्चात हवे ते शिक्षण घेऊ शकणार आहे. या प्रकारच्या विद्यापीठातून मोठ्या प्रमाणात शिक्षणाचे सार्वत्रिकीकरण होऊन, याच माध्यमातून शहरातील दर्जेदार संस्थांमधील शिक्षण ग्रामीण भागापर्यंतही पोहोचविता येणे शक्य होईल.