Join us  

राज्यात फक्त १ हजार २५७ शिक्षकांची गरज

By admin | Published: August 18, 2016 4:03 AM

राज्यातील खासगी संस्थांच्या माध्यमिक शाळांची २०१५-१६ या वर्षातील आॅनलाईन संचमान्यता राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केली आहे. या यादीत राज्यातील शाळांमधील ५ हजार ४८६ शिक्षकांच्या

मुंबई : राज्यातील खासगी संस्थांच्या माध्यमिक शाळांची २०१५-१६ या वर्षातील आॅनलाईन संचमान्यता राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केली आहे. या यादीत राज्यातील शाळांमधील ५ हजार ४८६ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे दाखवताना शासनाने ४ हजार २२९ शिक्षक हे अतिरिक्त ठरवले आहेत. त्यामुळे शिक्षक संघटनांनी शासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.शिक्षण विभागाने केलेल्या संचमान्यतेनुसार, राज्यातील शेकडो शाळांमध्ये केवळ १ हजार २५७ शिक्षकांचीच पदे रिक्त असल्याचे निदर्शनास येते. याउलट राज्यात सुमारे ३० हजार शिक्षकांची गरज असल्याचे शिक्षण संघटनांचे मत आहे. परिणामी, संचमान्यता म्हणजेच राज्यातील सरकारी, अनुदानित शाळा बंद पाडण्याचा डाव असल्याचा आरोप शिक्षक संघटनांनी केला आहे.संचमान्येता अहवालानुसार राज्यात नाशिक जिल्ह्यामध्ये शिक्षकांच्या सर्वाधिक म्हणजेच ६६५ जागा रिक्त आहेत. त्याखालोखाल औरंगाबादमध्ये ३४२, सांगलीमध्ये ३३४ आणि पालघर जिल्ह्यातील शाळांमध्ये २०६ शिक्षकांची पदे रिक्त आहेत. आश्चर्याची बाब म्हणजे सातारा आणि सोलापूर या दोन्ही जिल्ह्यांमध्ये शिक्षकाचे एकही पद रिक्त नसल्याचा जावई शोध लावण्यात आला आहे. याउलट या दोन्ही जिल्ह्यांतील अनक्रमे ४१ आणि ५२ शिक्षक अतिरिक्त ठरवण्यात आले आहेत. (प्रतिनिधी)मुंबईतल्या २९३ शिक्षकांच्या नोकरीवर गदामुंबईतील पूर्व, ईशान्य आणि दक्षिण विभागात असलेल्या माध्यमिकच्या शाळांमध्ये ६७४ शिक्षकांच्या जागा रिक्त असल्याचे अहवालात नमूद केले आहे. तर ९६७ शिक्षकांना अतिरिक्त ठरवण्यात आले आहे. परिणामी मुंबईतील शाळांमधील २९३ शिक्षकांच्या रोजगारावर गदा येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात मात्र २३ पदे अतिरिक्त ठरली असली, तरी ८१ शिक्षकांची पदे रिक्त असल्याचे निदर्शनास आले. तर रत्नागिरीमध्ये ७० शिक्षकांची पदे रिक्त असून ११४ शिक्षकांना अतिरिक्त ठरविण्यात आले आहे. दरम्यान, आॅनलाईन संचमान्यतेच्या अहवालात हिंगोली, पुणे, रायगड आणि ठाणे या चार जिल्ह्यांतील रिक्त आणि अतिरिक्त पदांची माहिती उपलब्ध नव्हती.