प्रतिबंधात्मक टास्क फोर्सची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:06 AM2021-04-07T04:06:57+5:302021-04-07T04:06:57+5:30
प्रतिबंधात्मक उपाययाेजनांसाठी विशेष टास्क फोर्सची गरज डॉ. संजय कपोते यांचा सल्ला लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : राज्यासह मुंबईतील कोरोनाच्या ...
प्रतिबंधात्मक उपाययाेजनांसाठी विशेष टास्क फोर्सची गरज
डॉ. संजय कपोते यांचा सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : राज्यासह मुंबईतील कोरोनाच्या स्थितीत दैनंदिन रुग्णांची आकडेवारी झपाट्याने वाढत असल्याचे दिसत आहे. मात्र, मागील वर्षाच्या तुलनेत अद्याप मृत्यूदर कमी असून, सामान्यांनी घाबरून जाण्याची गरज नाही. सध्या राज्यासह मुंबईत कोरोनाच्या प्रादुर्भावावर निरीक्षण आणि कृती आराखडा तयार करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन केले आहेत. याचप्रमाणे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्यासाठी विशेष टास्क फोर्सची गरज आहे. संपूर्णतः लाॅकडाऊनला पर्याय सुचविण्यासाठी राज्य शासन विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांशी चर्चा करीत आहे, या पार्श्वभूमीवर अपोलो क्लिनिकचे संचालक डॉ. संजय कपोते यांनी कोरोनाची दुसरी लाट थाेपण्यासाठी काय करता येईल याविषयी ‘लोकमत’शी विशेष संवाद साधला.
डॉ. कपोते म्हणाले, प्रतिबंधात्मक टास्क फोर्समध्ये साथरोगतज्ज्ञ, विषाणूतज्ज्ञ, संसर्गरोगतज्ज्ञ, लस विशेषज्ञ, सोशो इकाॅनाॅमिस्ट, अर्बन ट्रान्सपोर्ट प्रोगॅमर, बिहेव्हिअरल सायकोलाॅजिस्ट आणि मेडिकल डेटा ॲनालिस्ट या तज्ज्ञांचा समावेश करावा. या तज्ज्ञांच्या समितीकडून शहरात लाॅकडाऊन करण्याविषयी मार्गदर्शन आणि सल्ला घ्यावा. जेणेकरून, कोणत्याही आजाराच्या साथीचे व्यवस्थापन करणे सोपे ठरेल.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नव्या म्युटेशनचा धोका कमी असून, रोगमुक्तता दर अधिक आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यावर डॉक्टरांकडे ठोस उपचारपद्धती नव्हती. मात्र, आता कोरोनाच्या विविध स्थितीतील रुग्णांना कशा प्रकारे उपचार द्यायचे याची पद्धत निश्चित आहे. वाढत्या दैनंदिन रुग्णसंख्येला घाबरून न जाता या रुग्णांपैकी केवळ ज्या कोविड रुग्णांना श्वसनविकार उद्भवले आहेत त्यांना रुग्णालयात दाखल करण्याची गरज आहे.
मुंबईत दिवसाला ४० हजारांहून अधिक, तर राज्यातही १ लाख ८० हजारांच्या घरात चाचण्या होत आहेत. त्यामुळे रुग्ण निदानाचे प्रमाण वाढले आहे, या स्थितीला घाबरून न जाता कोरोनाविषयक नियमांचे पालन करून, लस घेऊन संसर्ग नियंत्रणासाठी प्रयत्न व्हायला हवेत. निर्बंध लावून लोकांचा वावर रोखला तरीही मास्कचा वापर, स्वच्छता, सॅनिटायझर वापरणे, शारीरिक अंतर राखणे या नियमांचे काटेकोरपणे पालन करायला हवे. लसीकरणाची मोहीम व्यापक करायला हवी. सध्याच्या संसर्गवाढीत दुसरी सकारात्मक बाब म्हणजे, नैसर्गिक सामूहिक प्रतिकारकशक्तीसह लसीकरणामुळे सामूहिक राेगप्रतिकारकशक्ती तयार हाेण्यास सुरुवात झाली आहे.
राज्यातील शासकीय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये विषाणूतज्ज्ञ असतात. कोरोना असो किंवा अन्य आजारांच्या स्थितीत त्यांच्या माध्यमातून संशोधनावर अधिक भर देण्यात यावा. त्यांच्या मदतीने एखाद्या विषाणूचे बदलते स्वरूप, तीव्रता, उपचारपद्धती अशा विविध शाखांविषयी संशोधन व अभ्यास करता येतो. यामुळे संसर्ग नियंत्रणासाठी यंत्रणांना निश्चितच मदत होईल, असा विश्वास डॉ. कपोते यांनी व्यक्त केला.
....................