‘स्वच्छ भारत’साठी लोकसहभागाची गरज
By admin | Published: October 3, 2015 02:44 AM2015-10-03T02:44:32+5:302015-10-03T02:44:32+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले ‘स्वच्छ भारत’ अभियान लोकसहभागाशिवाय सत्यात उतरणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेले ‘स्वच्छ भारत’ अभियान लोकसहभागाशिवाय सत्यात उतरणार नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. गांधी जयंतीचे निमित्त साधत मुंबई विद्यापाठाच्या विधी विभागाने शुक्रवारी आयोजित केलेल्या स्वच्छता अभियान रॅलीच्या कार्यक्रमात ते बोलत होते.
मुख्यमंत्री म्हणाले, एकीकडे देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात कक्षा रुंदावत असताना देशातील काही भागात अजूनही उघड्यावर शौचास बसणे, सांडपाणी आणि घणकचरा या समस्या भेडसावत आहेत आणि यातूनच मार्ग काढण्यासाठी क्लीन इंडिया ही संकल्पना राबविली जात आहे. विधी विभागाने हाती घेतलेला उपक्रमाची प्रशंसा करत विद्यार्थ्यांच्या संकल्पातून परीवर्तनाची लाट निर्माण होणार असल्याचा आशावादही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
यावेळी मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. संजय देशमुख म्हणाले की, ज्ञानदानाच्या पवित्र कार्याबरोबरच देशाची ज्ञानविषयक गौरवशाली परंपरा आणि वाढता सामाजिक-आर्थिक प्रभाव पाहता मुंबई विद्यापीठ सामाजिक बांधिलकीच्या नात्यातून नेहमीच अशा अभिनव उपक्रमांसाठी तत्पर राहणार आहे. या अभियानात विधीचे शिक्षण घेणारे जवळपास ४०० विद्यार्थी, १५ एनजीओ, विधीतज्ज्ञ, शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते आणि प्रशासकिय अधिकारी सामील झाले होते. (प्रतिनिधी)विधानभवनातही महात्मा गांधी यांना शुक्रवारी अभिवादन करण्यात आले. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी महात्मा गांधींच्या प्रतिमेस पुष्पहार व गुलाबपुष्प अर्पण करुन अभिवादन केले. यावेळी विधानपरिषद सदस्य डॉ. नीलम गोऱ्हे, हुस्नबानू खलिफे आदी मान्यवर उपस्थित होते.
पतंजली योग समितीच्या वतीने गांधी जयंतीनिमित्त आचार्य रामदेव बाबा आणि बालकृष्ण महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध ठिकाणी स्वच्छता अभियान पार पडले. या अभियानाचा प्रारंभ दादर पूर्वेकडील स्वामिनारायण मंदिर परिसरातून झाला. डेंग्यू, मलेरिया, स्वाईन फ्ल्यू यांसारख्या साथींच्या आजाराची खबरदारी कशी बाळगावी, त्यासंबंधीच्या उपाययोजना अभियानाच्या माध्यमातून स्थानिकांना सांगण्यात आल्या.