ग्राहकांच्या आवडीनिवडी, त्यांना काय हवंय हे लक्षात घेऊन पर्यटन व्यवसायाची आखणी केली तर या व्यवसायात चांगले यश आहे. आपल्याकडे जे आहे ते पर्यटकांना देण्यापेक्षा, पर्यटकांना जे हवंय ते देण्याने हा व्यवसाय वृध्दिंगत होईल. याचाच विचार करून उपक्रमांची आखणी केली जाते आणि म्हणूनच प्रत्येक उपक्रमाला पर्यटकांचा उत्तम प्रतिसाद लाभतो, असे मत चिपळूण हॉटेल प्रा. लि.चे महाव्यवस्थापक विजय गावकर यांनी आपल्या ‘संवादा’त व्यक्त केले.कोकणची सांस्कृतिक राजधानी म्हणून चिपळूणची खऱ्या अर्थाने ओळख आहे. याला परशुराम भूमीही संबोधले जाते. जिल्ह्याच्या अत्यंत मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या या शहराचा गेल्या १५ वर्षातील विकासाचा वेग तीव्र आहे. त्यामुळेच व्यावसायिक ठिकाण म्हणून हे शहर नावारुपाला आले आहे. या शहरामध्ये वेगवेगळ्या कंपन्यांसह शासकीय कार्यालये, एजन्सी, जवळपास पस्तीसपेक्षा अधिक बँकांच्या शाखा, अनेक पतपेढ्या यांचे जाळे पसरले आहे. ब्रिटिश काळापासून चालत आलेली बाजारपेठ प्रसिध्द आहे. परशुराम भूमीत मुंबई - गोवा महामार्गावर महेंद्रगिरी पर्वतावर भगवान परशुराम मंदिराच्या कुशीत चिपळूण हॉटेल प्रा. लि. कंपनीचे ‘दि रिव्हर व्ह्यू’ हॉटेल पर्यटकांचे आकर्षण आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत समाजाशी समरस होऊन लोकांना हवे ते देण्याचा प्रयत्न कंपनीचे महाव्यवस्थापक विजय गावकर करीत आहेत. एकूणच पर्यटन व विकास याबाबत त्यांच्याशी साधलेला हा संवाद. प्रश्न : शहरालगत डोंगरावर वसलेल्या या हॉटेलच्या माध्यमातून कोणकोणते सण, उत्सव साजरे करता?उत्तर : खरेतर विस्तीर्ण दाभोळ खाडी आणि वाशिष्ठीचे बारमाही पात्र, समोर दिसणारा गोवळकोटचा गोविंदगड, कालुस्ते पूल, नारळी पोफळीचे नेत्रसुख व निसर्गाची भुरळ पाडणारे सौंदर्य तसेच सूर्यास्त येथे बसल्या जागेवरून पर्यटकांना पाहायला मिळतो. प्रत्यक्ष किनाऱ्यावर जाण्यापेक्षा या सुंदर व स्वच्छ वातावरणात पर्यटक खिळून राहतात. त्यामुळेच पर्यटकांची आम्हाला अधिक पसंती आहे. मुंबई, पुण्याबरोबरच इतर मोठ्या शहरातून पर्यटक येथे येतात तसेच विविध स्तरावरील उच्च पदस्थ शासकीय अधिकारी, राजकीय पक्षांचे पुढारी, मंत्री आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू हेही बिनदिक्कतपणे येथे येत असतात. निसर्गाने मुक्तहस्ते उधळण केलेल्या कोकणची नजाकत त्यांना येथे अनुभवायला मिळते. येथील सौंदर्य पाहून तेही खुलून जातात, हेच आमचे यश आहे. विविध हंगामात येणारे सण, उत्सव स्थानिक नागरिकांच्या मदतीने आम्ही साजरे करतो. त्यासाठी नाताळ, ३१ डिसेंबरला वर्षाची सांगता व नववर्षाचे स्वागत, नवरात्रोत्सवातील दांडिया असे काही कार्यक्रम येथे लोकांच्या आवडीप्रमाणे साजरे केले जातात. प्रश्न : स्थानिक नागरिकांचे व कर्मचाऱ्यांचे आपल्याला कसे सहाय्य लाभते ? उत्तर : स्थानिक नागरिकांच्या आवडी निवडीवर आमचे कार्यक्रम अवलंबून असतात. आतापर्यंत त्यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले आहे. त्यांचे सहकार्य आहे म्हणूनच त्यांच्याबरोबर इतर पर्यटकही येथे मोठ्या संख्येने येतात. दोन रात्री आणि एक दिवस फ्री हॉल्ट ‘लकी ड्रॉ’ कुपनच्या माध्यमातून आपण ग्राहकांना देत आॅफर देत असतो. इतर हॉटेल व्यावसायिकही आमची कुपन देत असतात. त्यामुळे व्यावसायिक आदान - प्रदान होत असतानाच स्थानिक ग्राहकांचे हीतही जोपासले जाते. येथे येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाने खूश होऊन जावे, हा आमचा प्रयत्न असतो. यासाठी आमचे सर्व कर्मचारी तत्पर असतात. त्यांच्या सहकार्यामुळेच आमचे काम सुसह्य व हलके होते. कर्मचाऱ्यांच्या जीवावरच हा डोलारा उभा असून, त्यांच्यामुळेच आम्हाला यश मिळते, असेही गावकर यांनी स्पष्ट केले. प्रश्न : गोव्याकडे जाणारा पर्यटक कोकणाकडे वळत आहे, याबाबत आपले मत काय? उत्तर : गोवा हा गोवाच आहे. तेथे जाणारा पर्यटक येथे थांबत नाही. कारण गोव्यात तो राहण्यासाठी जातो. गोव्यात जाताना वाटेतील चार पर्यटनस्थळे पाहावित म्हणून तो या परिसरात फिरत असतो. पण येथे आल्यानंतर फिरायचा प्रॉब्लेम होतो. इथे फिरायचे कोठे? कोठे जायचे? याचे डेस्टिनेशन होत नाही. गोवा, महाबळेश्वरसारखी विकसित ठिकाणे येथे नाहीत. येथे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी खूप लांबचे अंतर तोडावे लागते. त्यामुळे दोन पर्यटनस्थळांच्या मध्ये अनेक पॉर्इंट किंवा काही सेंटर पर्यटनदृष्ट्या विकसित होणे गरजेचे आहे. त्यामुळे गोव्याची तुलना आपल्याशी नको. प्रश्न : पर्यटन वृध्दीसाठी आपल्याकडे आणखी काय व्यवस्था असायला हवे?उत्तर : आमच्याकडे येणारा पर्यटक चिपळूण परिसरात फिरतो. दाभोळ खाडी परिसरात असलेल्या आयलँड पार्कवर जातो. क्रोकोडाईल सफारी करतो, पाणपक्षी पाहतो. जवळच असलेल्या परशुराम मंदिरात जाऊन ऐतिहासिक मंदिराचे दर्शन घेतो. काही पर्यटक समोर असलेल्या गोविंदगड किल्ल्यावर जातात, तरीही ही ठिकाणे कमी पडतात. येथे तासन्तास खिळून राहावे, अशा सोयी सुविधा किंवा अॅट्रॅक्शन सेंटर्स नाहीत ती होणे गरजेचे आहे. आता त्याबाबत चळवळ सुरु झाली आहे. पर्यटनाचे महत्त्व लोकांना समजू लागले आहे. त्यातूनच निवास, न्याहरीसारखी सेंटर्स उभी राहात आहेत. आपला विकास पर्यटनाच्या माध्यमातून होऊ शकतो, याची जाणीव लोकांना झाली आहे. ही चळवळ आता जोर धरत आहे. त्यातून आपला चांगला फायदा होत आहे, हे लोकांना कळू लागले आहे. भविष्यात पर्यटनदृष्ट्या येथे चांगली ठिकाणे निर्माण होतील, अशी अपेक्षा आहे. प्रश्न : माहिती आणि तंत्रज्ञानाच्या युगात आणखी कोणत्या अडचणी भेडसावतात ? उत्तर : आपल्याकडे अजून इंडस्ट्रियल ग्रोथ होणे गरजेचे आहे. अनेकवेळा दूरध्वनीच्या अडचणी असतात. कनेक्टिव्हिटी नसते. त्यामुळे बाहेर संपर्क साधणे अडचणीचे होते. व्यवहार ठप्प होतात. याचा फटका पर्यटकांना बसत असतो. आपल्याकडे हाय सोसायटीपासून सर्वसामान्य पर्यटकही येत असतात. उद्योग, व्यवसायाच्या माध्यमातून येणाऱ्या लोकांना चांगली सेवा मिळत नाही. त्यामुळे ते नाराज होतात. आम्ही आमच्यापरीने त्यांना आवडीनुसार सेवा देण्याचा प्रयत्न करतो. आमच्या तत्पर सेवेमुळेच आमच्याकडे वर्षानुवर्षे पर्यटक व उच्च पदस्थ अधिकारी येत असतात. येथे राहून जाताना त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद आणि समाधान आम्हाला आमच्या यशाची पोचपावती देऊन जाते. परंतु, पर्यटनदृष्ट्या आपला भाग अजूनही विकसित व्हायला हवा. जसा पर्यटक महाबळेश्वर किंवा गोव्याकडे आकर्षिला जातो तसा तो आपल्याकडे यायला हवा. त्यासाठी शासनस्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. प्रश्न : स्थानिकांशी आपले अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहेत, यासाठी आपण काय करता? उत्तर : आमच्याकडे जसे हाय प्रोफाईल व्यक्ती कुटुंबासह येतात, तसेच स्थानिक लोकही आपल्या कुटुंबासह येथे येत असतात. स्थानिकांच्या जीवावरच आम्ही आजपर्यंत टिकून आहोत. आमच्याकडे लहान मोठ्या पार्ट्या, लहान मोठे कार्यक्रम आयोजित करतो. अगदी साखरपुडा, लग्न, रिसेप्शनसाठीही आमच्याकडे लोक येतात. आम्ही त्यांना त्यांच्या आवडीनुसार दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न करतो. आमचे कर्मचारीही न कंटाळता आपले काम चोख बजावतात. त्यामुळे स्थानिक लोकही आमच्याशी सलोख्याने वागतात. त्यांचे नि आमचे असणारे ऋणानुबंध अधिक घट्ट आहेत. लोकांना आवडीचे पदार्थ व त्यांना चांगली सेवा देण्याचा आमचा प्रयत्न असतो. कारण पैसे खर्च करून येणाऱ्या व्यक्तीला चांगली सेवा मिळाली नाही तर ते चिडचिड करतात. हा मानवी स्वभाव आहे व त्यात चुकीचे काही नाही. त्यामुळे ‘गिव्ह अॅण्ड टेक पॉलिसी’ वापरावीच लागते. शिवाय लोक आहेत म्हणून आपला व्यवसाय आहे. सामाजिक बांधिलकी जोपासून अधिक काही चांगले करण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि तो यापुढेही कायम राहील अशी अपेक्षा गावकर यांनी व्यक्त केली. - सुभाष कदम
समाजाभिमुख पर्यटन उपक्रम हीच खरी आजची गरज : विजय गावकर
By admin | Published: December 28, 2015 11:57 PM