इतिहासाचे शुद्धीकरण करण्याची गरज

By admin | Published: December 27, 2016 01:39 AM2016-12-27T01:39:01+5:302016-12-27T01:39:01+5:30

इतिहासातील वाद संपण्याची शक्यता कमी असून इतिहासकारानेच एकांगी इतिहासलेखनापेक्षा सर्व मतांचा विचार करून त्यावर शुद्धीकरण करून इतिहासलेखन करावे, असे प्रतिपादन माजी

The need to refine history | इतिहासाचे शुद्धीकरण करण्याची गरज

इतिहासाचे शुद्धीकरण करण्याची गरज

Next

बदलापूर : इतिहासातील वाद संपण्याची शक्यता कमी असून इतिहासकारानेच एकांगी इतिहासलेखनापेक्षा सर्व मतांचा विचार करून त्यावर शुद्धीकरण करून इतिहासलेखन करावे, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी केले.
डोंबिवली येथे होणाऱ्या नव्वदाव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनापूर्वीचे विचारयात्रा संमेलन बदलापुरात भरवण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेची कुळगाव-बदलापूर शाखा, आगरी युथ फोरम, आदर्श कला आणि वाणिज्य महाविद्यालय आणि ग्रंथसखा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने हे संमेलन बदलापुरातील काटदरे सभागृहात भरवण्यात आले होते.
या संमेलनात सायंकाळच्या सत्रात डॉ. सदानंद मोरे यांची ‘लोकमान्य ते महात्मा’ या पुस्तकावर मुलाखत घेण्यात आली. या पुस्तकातील अनेक उल्लेखांवर ग्रंथसखाचे श्याम जोशी यांनी डॉ. मोरे यांना बोलते केले. या वेळी त्यांनी इतिहास, त्याचे विविध प्रवाह, मतभेद, इतिहासाचार्य वि.का. राजवाडे अशा विविध विषयांवर आपले परखड मत मांडले.
इतिहासातील विविध प्रवाहांतील कोणत्या इतिहासाला खरे मानावे, या प्रश्नावर सर्व मतांचा आदर करून त्यांचा विचार करत शुद्धीकरण करून इतिहासलेखन करावे, असे मत त्यांनी व्यक्त केले. देशाचा इतिहास लोकमान्य टिळकांशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे दिल्लीच्या महाराष्ट्र सदनात त्यांच्या पुतळ्यासाठीही आग्रही होतो.
भारताचे पहिले नेतृत्व टिळकच होते, असाही पुनरुच्चार त्यांनी या वेळी केला. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्राह्मणेतर चळवळीच्या अनेकांनी काँग्रेसचे नेतृत्व स्वीकारले. मात्र, त्यानंतर काँग्रेसला ब्राह्मणेतर विचार अडचणीचा ठरू लागला. त्यामुळे त्या काळात ब्राह्मणेतर विचार दाबले गेले. (प्रतिनिधी)

इतिहासातील वाद मिटावेत
दाबलेले ब्राह्मणेतर विचार जातीय संघर्षाच्या माध्यमातून उफाळून आल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.
इतिहासाच्या वादावर जोशी यांनी डॉ. मोरे यांना विचारले असता, त्यांनी इतिहासातील वाद संपण्याची शक्यता नाही, असे उत्तर दिले. जैन विचारसरणीतील लय सिद्धान्त मानून इतिहासाची मांडणी करून त्याचे शुद्धीकरण केल्यास खरा इतिहास पुढे येऊ शकतो, असेही डॉ. सदानंद मोरे यावेळी म्हणाले.

Web Title: The need to refine history

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.