मुंबई : मराठी भाषा प्राधिकरण होण्यासाठी मराठी भाषा शिक्षक, मराठी साहित्यिक, पक्षकार, मराठी नाट्य व सिनेकलावंत आणि मराठी जनतेने प्रचंड संख्येने रस्त्यावर उतरण्याची गरज आहे, असे परखड मत ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक यांनी मांडले.
मुंबई मराठी साहित्य संघ आणि कोकण मराठी साहित्य परिषदेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी साहित्य संघात मराठी शिक्षण कायदा आणि प्राधिकरण या विषयावर परिसंवाद पार पडला. या परिसंवादात ते बोलत होते. याप्रसंगी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाद जोशी म्हणाले की, मराठी भाषेची, भाषकांची सर्वपक्षीय आमदार, खासदारांकडून अवहेलना चालली आहे. ती पाहता त्या सर्वांना मराठी भाषाविरोधी सरंजमवादी राजकारण का करताय? असा जाब विचारला पाहिजे. येत्या निवडणुकीत या सर्वांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे.