मुंबई : दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी अंतर्गत गुण पुन्हा सुरू करण्याचा निर्णय स्वागतार्ह असला तरी कृतिपत्रिकांचे स्वरूप विशेषत: मराठी विषय आणखी सोपा करण्याची मागणी संघटना, शिक्षकांची आहे. ९ वी ते १२ वीच्या अंतर्गत मूल्यमापन पद्धतीमध्ये नुकतेच काही बदल शिक्षण विभागाने केले. यात अमराठी विद्यार्थ्यांना मराठीची गोडी लागावी व भाषा विषयांत चांगले गुण मिळावेत यासाठी भाषेच्या काठिण्य पातळीवर विचार करण्याची गरज शिक्षकांनी व्यक्त केली आहे.नवीन अंतर्गत मूल्यमापन पद्धतीनुसार शैक्षणिक वर्ष २०१९-२० पासून अभ्यासक्रमात अनेक दुर्बोध घटक समाविष्ट केले आहेत. पाठ नसलेल्या गद्य विषयांवरील सारांश लेखन करून ५ गुण मिळविणे अमराठी शाळांतील विद्यार्थ्यांसाठी कठीण जात असल्याचे महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाच्या अभ्यास समितीचे माजी सदस्य, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूलचे शिक्षक उदय नरे यांनी सांगितले.मराठीच्या व्याकरणातील अलंकार, समास, पाचवी ते नववीतील व्याकरण घटकांवर नवीन अभ्यासक्रमात विचार होणे गरजेचे आहे. कृतिपत्रिकेवरच उत्तर लिहिण्याची सोय केली तर विद्यार्थ्यांचा वेळ आणि शिक्षण मंडळाचे लाखो रुपये वाचतील. शिवाय उत्तरपत्रिका गहाळ होण्याची शक्यताही कमी होऊ शकते. यासंदर्भात शिक्षणमंत्री आशिष शेलार यांना पत्र लिहिले असून मार्गदर्शन करण्याची विनंती केली आहे, असेही नरे यांनी सांगितले.
‘मराठी विषय आणखी सोपा करण्याची गरज’
By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2019 6:02 AM