लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : श्री गाडगे महाराजांच्या विचारसरणीनुसार आमचे सरकार काम करीत आहे. त्यांच्या जीवनचरित्राचे विविध भाषांमध्ये भाषांतर करून त्यांचे कार्य जगभरात पोहचवले पाहिजे, त्यासाठी राज्य शासन आवश्यक ती सर्व मदत करेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.
प्रबोधनकार ठाकरे लिखित ‘श्री गाडगे बाबा’ जीवनचरित्राच्या दहाव्या आवृत्तीचे मंगळवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सह्याद्री अतिथिगृहात प्रकाशन करण्यात आले. संत गाडगे महाराज मिशनने या आवृत्तीचे प्रकाशन केले आहे. याप्रसंगी मुख्यमंत्र्यांसह महिला व बालविकास मंत्री तथा गाडगे महाराज मिशनच्या अध्यक्षा यशोमती ठाकूर, आमदार बळवंत वानखडे, उल्हास पवार, इतिहास संशोधक डॉ. मंजुश्री पवार, मिशनचे चेअरमन मधुसूदन मोहिते- पाटील उपस्थित होते.
संत गाडगे बाबांनी अंधश्रद्धांवर आघात करून खरा धर्म शिकवला, असे सांगून मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले की, धर्म जगणे आणि धर्म जपणे यातील अंतर आपल्याला समजले पाहिजे. धर्म जगायचा असतो हे बाबांनी कृतीतून दाखवून दिले. भुकेल्यांना अन्न, तहानलेल्यांना पाणी, गरीब मुलामुलींना शिक्षण आदी दशसूत्रींतून हाच खरा धर्म आहे हे त्यांनी असंख्य व्याख्यानांतून जनतेपर्यंत पोहोचवले. त्यांनी कीर्तनातून लोकशिक्षण घडवले.
मुख्यमंत्री म्हणाले की, माझे आजोबा प्रबोधनकारांनी लिहिलेल्या आणि वडील बाळासाहेब ठाकरे यांनी मुखपृष्ठ चितारलेल्या या जीवनचरित्राचे प्रकाशन मुख्यमंत्री म्हणून करताना मला मनापासून आनंद होत आहे. प्रबोधनकार आणि संत गाडगेबाबा यांच्यात एक अनोखे नाते होते. गाडगेबाबांनी वक्तृत्वातून समाजातील अनिष्ट प्रथांविरुद्ध लोकांचे प्रबोधन केले. त्यांनी केवळ कीर्तने केली नाहीत तर शाळा उभारल्या, अन्नछत्रे सुरू केली, धर्मशाळा बांधल्या. गाडगे बाबांचे विचार पुढे नेण्यासाठी मिशनने काम करत राहावे, महाराष्ट्र शासन मिशनच्या पाठीशी खंबीर उभे राहील, अशी ग्वाही ठाकरे यांनी यावेळी दिली.
मंत्री ठाकूर म्हणाल्या की, संत गाडगेबाबा हे कृतीमधील आणि विचारामधील स्वच्छता जोपासणारे संत होते. धर्म, जातिभेदांमध्ये वाढ करणाऱ्या विभाजनवादी शक्तींबाबत जनजागृती करायची असेल तर हे पुस्तक उपयुक्त ठरेल. गाडगेबाबांची २०२६ मध्ये १५० वी जयंती असून त्यानिमित्ताने मिशनमार्फत विविध उपक्रम हाती घेतले जातील, असे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी मंजुश्री पवार आणि उल्हास पवार यांचीही भाषणे झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मिशनच्यावतीने मुख्यमंत्री ठाकरे यांना संत गाडगेबाबा यांची प्रतिमा आणि संदेश असलेले सन्मानचिन्ह देण्यात आले.