धर्माच्या नावाखाली होणाऱ्या हत्या थांबविण्याची गरज - हायकोर्ट
By ऑनलाइन लोकमत | Published: July 8, 2018 06:20 AM2018-07-08T06:20:45+5:302018-07-08T06:21:20+5:30
देशहितासाठी आणि आपली संस्कृती, एकात्मता अबाधित ठेवण्याकरिता धर्माच्या नावाखाली फाशी देण्याचे किंवा हत्या होण्याचे प्रकार थांबविले पाहिजेत, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले.
मुंबई - देशहितासाठी आणि आपली संस्कृती, एकात्मता अबाधित ठेवण्याकरिता धर्माच्या नावाखाली फाशी देण्याचे किंवा हत्या होण्याचे प्रकार थांबविले पाहिजेत, असे मत उच्च न्यायालयाने व्यक्त केले. दाभोलकर-पानसरे यांचे मारेकरी अद्याप तपास यंत्रणांच्या हाती लागत नसल्याने उच्च न्यायालयाने खंतही व्यक्त केली.
डॉ. नरेंद्र दाभोलकर व कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्येचा तपास सीबीआय व महाराष्ट्र एसआयटी करत आहे. हे दोन्ही तपास न्या. एस. सी. धर्माधिकारी व न्या. भारती डांग्रे यांच्या खंडपीठाच्या देखरेखीखाली सुरू आहेत. दोन्ही हत्यांना पाच वर्षे होत आली तरी मारेकरी अद्याप फरार असल्याने उच्च न्यायालयाने काहीच दिवसांपूर्वी नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने सीबीआयचे सहसंचालक शरद अग्रवाल आणि अतिरिक्त मुख्य सचिव सुनील पोरवाल यांना समन्स बजावले.
या वेळी न्यायालयाने म्हटले की, या कामासाठी (हत्या करण्यासाठी) गरीब व बेरोजगार तरुणांना निवडले जाते. त्यांचे ब्रेन वॉश केल्यानंतर ते माणसांची हत्या करण्यासाठी सहजच तयार होतात. अलीकडे प्रत्येक धर्मातील जहालवादी अशाच तरुणांच्या शोधात असतात.
त्यांच्या मदतीने व सहकार्याने विचारवंत, पत्रकार, सुधारक, सामाजिक कायकर्ते, लेखक यांना लक्ष्य करून पद्धतशीरपणे बाजूला करण्यात येते (हत्या करणे). देशहितासाठी आणि आपली संस्कृती, एकात्मता जपण्यासाठी धर्माच्या नावाने फाशी देणे व हत्या करणे थांबले पाहिजे.
सीबीआय, एसआयटीला घेतले फैलावर
कर्नाटकच्या ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांच्या मारेकºयाला महाराष्ट्रातून अटक करण्यात आली आणि दाभोलकर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप मोकाट असल्याने न्यायालयाने सीबीआय व एसआयटीला फैलावर घेतले. कर्नाटक पोलीस दाखवत असलेली तत्परता सीबीआय, एसआयटी का दाखवत नाही, असा सवालही न्यायालयाने करत या याचिकांवरील सुनावणी १२ जुलै रोजी ठेवली आहे.