Join us  

मोबाइलवर बोलणे पडले महागात ?

By admin | Published: May 25, 2016 2:44 AM

मोबाइलवर बोलताना किंवा मोबाइलवर गाणी ऐकून रेल्वे रूळ ओलांडताना अपघाताला सामोरे जावे लागल्याच्या अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. अशाच घटनेत प्लॅटफॉर्मवर उभे

मुंबई : मोबाइलवर बोलताना किंवा मोबाइलवर गाणी ऐकून रेल्वे रूळ ओलांडताना अपघाताला सामोरे जावे लागल्याच्या अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत. अशाच घटनेत प्लॅटफॉर्मवर उभे राहून मोबाइलवर बोलणे एका प्रवाशाला महागात पडले. मोबाइलवर बोलत असताना जलद लोकलकडे त्याचे लक्ष गेले नाही. या लोकलची धडक लागून प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला. मृत झालेल्या इसमाचे नाव हे बाबूराव पाटील असून, त्यांचे वय ५0 ते ५५च्या दरम्यान असल्याचे रेल्वे पोलिसांकडून सांगण्यात आले. सकाळी ११च्या सुमारास बाबूराव पाटील हे लोअर परेल स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक ३वरील मधल्या ठिकाणी उभे होते. पाटील हे मोबाइलवर बोलण्यात मग्न होते. मोबाइलवर बोलत असतानाच त्यांचे डाऊनला जाणाऱ्या जलद लोकलकडे दुर्लक्ष गेले आणि त्याची जोरदार धडक त्यांना लागली. धडक लागताच मोटरमनने लोकल त्वरित थांबविली. मात्र जोरदार धडक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आणि मृतदेहाचे तुकडे रेल्वे रुळांवर अक्षरश: छिन्नविछिन्न अवस्थेत पसरले. या घटनेनंतर मोटरमनने आणि प्रवाशांनी रेल्वे पोलीस तसेच स्थानक कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. ही माहिती मिळताच हमालांसह रेल्वे पोलीस व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. लोकल जाताच हमालांकडून ते तुकडे जमा करण्यास सुरुवात करण्यात आली. या अपघाताची मुंबई सेंट्रल जीआरपीत नोंद करण्यात आली. प्लॅटफॉर्मवर मोबाइलवर बोलताना लोकलने धडक देऊन अपघात झाल्याची माहिती प्रवाशांकडून देण्यात आली. अपघाताची नोंद केली असून, नेमका अपघात कसा झाला याचा तपास करत आहोत. - दत्तात्रय बंडगर (सहायक पोलीस उपनिरीक्षक, मुंबई सेंट्रल)