आयआयटीयन्सना डीएज्युकेट, डीलर्न करण्याची गरज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2024 10:10 AM2024-05-13T10:10:07+5:302024-05-13T10:11:12+5:30
त्याला मी डीएज्युकेट, डिलर्न करणे म्हणतो.
प्रा. शिरीष केदारे, संचालक, आयआयटी मुंबई
कुठलीही गोष्ट करताना त्याच्या रिझल्टपेक्षाही, ते मिळवताना होणारी प्रक्रिया (प्रोसेस) सर्वांत महत्त्वाची आहे. आयआयटीच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना माझे हेच सांगणे असते. त्यांनी अमूक इतकेच मार्क मिळविले पाहिजे, असा आग्रह कधीच नसतो. उलट पहिल्या वर्षात कोटा संस्कृतीमुळे लागलेल्या, त्यांच्या अध्ययनाच्या वाईट सवयी दूर करण्याकडे आमचा कल असतो. त्याला मी डीएज्युकेट, डिलर्न करणे म्हणतो.
या प्रक्रियेचा भाग म्हणून अनेकदा वर्गात विद्यार्थ्यांशी वृत्तपत्रांतील बातम्यांवर चर्चा करतो. क्लायमेट चेंजसारखी त्यांच्या विषयाशी संबंधित एखादी बातमी मोठ्याने वाचून त्यांना त्यावर व्यक्त व्हायला सांगतो. त्यामुळे आपल्या विषयाची व्यापक दृष्टिकोनातून ओळख व्हायला मदत होते. आयआयटीतील अनेक प्रयोगशील प्राध्यापक आपापल्या पद्धतीने हे करत असतात. बी.टेक.च्या पहिल्या वर्षाचे विद्यार्थी इंटर्नशिप कुठे करू म्हणून विचारत येतात. एकतर त्यांचे पहिल्या वर्षातील ज्ञान फारच मर्यादित असते तेव्हा त्यांना तुला जे आवडेल ते कर, असे सांगतो. कोविडकाळात तर मुलांना घरी सोलर कुकर बनविण्याची असाईनमेंट दिली होती. मुले यातून बरेच काही शिकली.
शिक्षकांवरील दुसरी जबाबदारी म्हणजे विद्यार्थ्यांमध्ये इंजिनिअरिंगचे टेंपरामेंट तयार करणे. अमूक एका शाखेला प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थी जीवाचे रान करतो. परंतु, इंजिनिअरिंगच्या त्या शाखेसाठी आवश्यक असलेले स्वभावगुण, त्याच्याकडे आहे की नाही, हे कळायला मार्ग नसतो. अशा वेळेस विद्यार्थ्यांना स्पून फीडिंग करण्याऐवजी इंजिनिअरिंगमधील विविध शाखांची बेसिक माहिती देणे आवश्यक असते. त्यातून त्यांच्यात एखाद्या विषयाविषयी रस वाढतो. त्यानंतर त्यांना जे आवडेल, ते त्यांनी निवडावे म्हणून माझ्या दृष्टीने ब्रँच ही दुय्यम गोष्ट आहे. आता तर मुलांना केवळ तंत्रज्ञान नव्हे तर मॅनेंजमेंट, डिझाईन, सामाजिक शास्त्रे असे अनेक विषय शिकता येतात आणि मुले आवडीने हे विषय निवडतही असतात.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामुळे आपल्या मुख्य शाखेतील (कोअर) विषयांबरोबरच अन्य विषय शिकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळते आहे. अभ्यासक्रम निवडीत लवचिकता आल्याने अन्य शाखेच्या विद्यार्थ्यांनाही कॉम्प्युटर सायन्स या सध्या अत्यंत लोकप्रिय असलेल्या शाखेतील विषय शिकता येतात. त्यामुळे जेईईचा रँक हा शाखा निवडीतील अडथळा राहिलेला नाही.
गेल्यावर्षी इंजिनिअरिंगबरोबरच आंत्रप्रुनरशीप हा विषय शिकण्यात ५००हून अधिक विद्यार्थ्यांनी रस दाखविला होता. मॅनेजमेंट पॉलिसी, अर्थशास्त्र, ह्युमॅनिटीजमधील विषय निवडण्याकडेही त्यांचा कल असतो. आयआयटीतील संशोधन कार्य प्रयोगशाळेच्या बाहेर नेणे गरजेचे आहे. ते समाजाशी, उद्योग जगताशी जितके जोडता येईल तितके जोडणे आवश्यक आहे, असे आयआयटीचा माजी विद्यार्थी आणि प्राध्यापक म्हणून प्रकर्षाने वाटते. आयआयटी मुंबईत ते होतेही आहे. येथे अनेक बायोलॉजिकल समस्यांवरही संशोधन केले जात आहे. बायोमेडिकल उपकरणे, थेरपी विकसित केल्या जात आहेत. आयआयटीच्या प्लेसमेंटचेही तेच आहे. प्लेसमेंटमुळे संस्था उद्योग जगताशी कनेक्ट होते. त्यांच्या गरजा आमच्या लक्षात येतात. त्यानुसार सुधारणा करण्याची संधी मिळते.
शहरी-ग्रामीण भागात लागणाऱ्या विविध तंत्रज्ञानावर आयआयटी काम करत आहे. आयआयटीच्या एका प्राध्यापकांनी ७० विद्यार्थ्यांच्या मदतीने ग्रामीण भागातील मुलींना विज्ञान, तंत्रज्ञान, मेडिकल, इंजिनिअरिंग विषयात शिकण्यासाठी प्रोत्साहन मिळावे याकरिता प्रयत्न केले होते. या उपक्रमाअंतर्गत ग्रामीण भागातील नववीत शिकणाऱ्या मुली आठवडाभर आयआयटीतील वसतिगृहात राहिल्या होत्या. त्यांच्याकरिता येथे कार्यशाळा घेण्यात आली होती. समाजाशी थेट संबंध असलेले असे उपक्रम येत्या काळात वाढविले जातील.