Join us

दिव्यांग व्यक्तींना योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज: राज्यपाल

By स्नेहा मोरे | Published: October 06, 2023 8:29 PM

युवा दिव्यांग विद्यार्थ्यांनी शुक्रवारी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली.

लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - दिव्यांग व्यक्ती कला - क्रीडा क्षेत्रात सामान्य व्यक्तींपेक्षा अधिक प्राविण्य मिळवतात. विशेष ऑलिम्पिकमध्ये दिव्यांग अनेक क्रीडा प्रकारांमध्ये उत्कृष्ट प्रदर्शन करीत आहे. दिव्यांगांना सहानुभूती नको, तर योग्य संधी व व्यासपीठ देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन राज्यपाल रमेश बैस यांनी केले.

जोगेश्वरी मुंबई येथील 'नॅशनल असोसिएशन फॉर द ब्लाइंड' (नॅब) या संस्थेचा उपक्रम असलेल्या 'एम एन बनाजी इंडस्ट्रियल होम फॉर द ब्लाइंड' या संस्थेतील युवा दिव्यांग विद्यार्थ्यांनी शुक्रवारी राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन येथे सदिच्छा भेट घेतली. काही कलाकार पायाने पेंटिंग करतात, तर काही दातांनी ब्रश धरून पेंटिंग करतात. पायाने सुईमध्ये धागा ओवण्याची क्षमता असलेली दिव्यांग व्यक्ती देखील आपण पाहिली आहे, असे राज्यपाल यांनी सांगितले.

बस स्टेशन, रेल्वे स्टेशन्स, शासकीय कार्यालये, महाविद्यालये व इतर सार्वजनिक संस्था दिव्यांगांकरिता प्रवेश व प्रवासाच्या दृष्टीने सुलभ असल्या पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. संसदेमध्ये पारित झालेले दिव्यांग व्यक्तींचे विधेयक अध्यक्षतेखालील संसदीय समितीने तयार केले होते, असे नमूद करून दिव्यांगांच्या कल्याणासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू, असे राज्यपालांनी सांगितले.यावेळी राज्यपालांनी संस्थेला पाच लाख रुपयांची देणगी जाहीर केली. याप्रसंगी, 'नॅब'च्या कार्यकारी संचालिका पल्लवी कदम, समाजसेविका बबिता सिंह, क्रीडा प्रशिक्षक चार्ल्स आदींनी राज्यपालांना संस्थेच्या कार्याची माहिती दिली. दिव्यांग व्यक्तींनी यावेळी स्वतः तयार केलेल्या भेटवस्तू राज्यपालांना भेट दिल्या.

टॅग्स :रमेश बैस