मुंबई : मुंबईतील आशा (नाव बदललेले) या २८ वर्षांच्या महिलेने चुकून लांब धारदार सुई गिळली. पडदा शिवत असताना तिने सुई तिच्या तोंडामध्ये धरली होती. तिला सुई कशी गिळली हे समजलेच नाही. सुई गिळल्यानंतर सहा तासांनी तिला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. आपत्कालीन विभागात पोटाचा एक्स-रे काढल्यानंतर समजले की सुई पोटामध्येच आहे. म्हणून, रुग्णाला रुग्णालयातील कन्सल्टंट गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट व थेरेपीटिक एन्डोस्कोपिस्ट डॉ. मेहुल चोक्सी यांच्याकडे उपचाराकरिता पाठविण्यात आले. डॉ. चोक्सी यांनी तीक्ष्ण सुई बाहेर काढण्यासाठी अपर गॅस्ट्रोइन्टेस्टिनल एन्डोस्कोपी प्रक्रिया केली. या प्रक्रियेमध्ये इन्टेस्टिनल पर्फोरेशनचा (आतड्यांना छीद्र पाडण्याची क्रिया) व गुंतागुंतीच्या क्रियेचा समावेश होता. एन्डोस्कोपी करत असताना असे दिसून आले की, सुई पोटामध्ये किंवा सुरुवातीच्या लहान आतड्यांमध्ये नव्हती, तर ती लहान आतड्यांमध्ये खोलवर भागात (जेजुनम) गेली होती. डॉ. चोक्सी यांनी आतड्यांमध्ये खोलवर जाण्याकरिता सिंगल बलून एन्टेरोस्कोप नावाच्या प्रगत व विशेषीकृत एन्डोस्कोपी उपकरणाचा उपयोग केला आणि काळजीपूर्वक सुई बाहेर काढली. सुई ५.२ सें.मी. इतकी लांब होती. डॉक्टरांनी कोणत्याही गुंतागुंतीशिवाय सुई बाहेर काढण्यामधील उच्च सक्षम प्रगत एन्डोस्कोपिक कौशल्ये दर्शवली. रुग्णाला दुसऱ्या दिवशी डिस्चार्ज देण्यात आला. ती वेळोवेळी तपासणी करून घेत आहे आणि तिला सामान्य आहार घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
शस्त्रक्रियेविना काढली घशात अडकलेली सुई
By admin | Published: April 09, 2017 3:33 AM